किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा ते महालक्ष्मी एक्सप्रेसचा प्रवास, दिवसभरात प्रचंड घडामोडी, नेमकं काय-काय घडलं?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडत आहेत.

किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा ते महालक्ष्मी एक्सप्रेसचा प्रवास, दिवसभरात प्रचंड घडामोडी, नेमकं काय-काय घडलं?
भाजप नेते किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 12:31 AM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला. पण तो आदेश न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय कायम ठेवला.

किरीट सोमय्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा

किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन रविवारी (19 सप्टेंबर) संध्याकाळी साडेसात वाजता कोल्हापुरच्या दिशेला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधून जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास किरीट सोमय्या यांच्या मुंबईच्या मुलुंड येथील घराच्या परिसरात अचानक मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. मुंबई पोलीस कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे परिपत्रक घेऊन सोमय्या यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी किरीट यांना कोल्हापूरला जाण्यास मज्जाव केला. तसेच घराबाहेर न पडण्याची विनंती केली. यावेळी सोमय्या यांनी पोलिसांना प्रतिकार करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

किरीट सोमय्या गिरगाव चौपाटीच्या दिशेला निघाले

किरीट सोमय्या यांनी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीत जायचं असल्याचं म्हटलं. पोलिसांनी त्यांना बराच वेळ अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि सोमय्या यांच्यात बाचाबाची झाली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं काय पाठवलंय त्यातील तांत्रिक बाजू कमी-अधिक प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर बराचवेळ पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सोमय्या यांना संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास घराबाहेर पडता आलं. ते गिरीगाव चौपाटीवर गेले. तिथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर गेले.

किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल

किरीट सोमय्या सीएसएमटी स्थानकावर दाखल होणार असल्याची कल्पना पोलिसांना आधीपासूनच होती. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर आधीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमय्या रेल्वे स्थानक परिसरात दाखल होताच मुंबई पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांचा प्रतिकार केला. पोलीस खूप प्रेमळ शब्दांनी सोमय्या यांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते. तर किरीट सोमय्या आक्रमकपणे कोल्हापूरला जाण्यास ठाम असल्याचं म्हणत होते.

दादर रेल्वे स्थानकावर सोमय्यांचा हायव्होल्टेज ड्रामा

यावेळी ते वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेत होते. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर जवळपास तासभर हा सगळा ड्रामा रंगला. अखेर सोमय्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत हे पाहिल्यानंतर पोलिसांनी स्वत: सोमय्या यांना कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसजवळ आणून सोडलं. यावेळी सोमय्या यांना मोठा आनंद झाला. ते गाडीत बसले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकावर सोमय्यांना अडवण्याचा प्रयत्न

अखेर महालक्ष्मी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकावरुन सुटली. ही एक्सप्रेस दादर रेल्वे स्थानकावर थांबली. त्यानंतर ती ठाण्याच्या दिशेला मार्गस्थ झाली. यादरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. ठाणे स्थानकावर गाडी आली तेव्हा ठाण्याचे पोलीस अधिकारी गाडीत आले. त्यांनी सोमय्या यांना गाडीतून उतरण्याची विनंती केली. पण सोमय्या यांनी नकार दिला. अखेर ठाणे पोलीस गाडीतून खाली उतरले. त्यानंतर एक्सप्रेस गाडीने ठाणे स्थानक सोडलं. पुढे कल्याण रेल्वे स्थानकावर असाच काहिसा प्रकार घडला. पण सोमय्या रेल्वेतून खाली उतरण्यास तयार नव्हते. पुढे गाडी कर्जत नंतर लोणावळ्याच्या दिशेला निघाली.

लोणावळा रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्ते दाखल, सोमय्यांचा सत्कार

महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा तिथे भाजप कार्यकर्तेही तिथे दाखल झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्या यांचं समर्थन केलं. तसेच काहिंनी सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी सोमय्या यांनी आपण कोल्हापुरात जाणारच, असं कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितलं. विशेष म्हणजे लोणावळा रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते देखील जमले होते. त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.

पुणे रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी देखील पुणे रेल्वे स्थानकावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली बघायला मिळाली. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांचं अभिनंदन केलं. तसेच जोरजोरात घोषणाबाजी केली.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका

या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेना नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांन या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. “भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्र्यांवर आरोप करत असतात. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. याशिवाय गणेशोत्सव सुरु आहे. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात आहेत. त्यांच्यावर ताण आहे. सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. त्यांच्या कोल्हापुरात जाण्याने त्यांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. कायद्यामध्ये ज्या तरतूदी आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाऱ्यांनुसार मनाईचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

भाजप नेते आक्रमक

किरीट सोमय्या यांच्या संदर्भात या सगळ्या घडामोडी घडत असताना राज्यातील भाजपचे दोन मोठे नेते दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यात बैठक होते. तसेच देवेंद्र फडणवीस ट्विट करुन सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यास मनाई केल्याने सरकारचा निषेध व्यक्त करतात. प्रविण दरेकरही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर टीका करतात. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या हे खूनी, बलात्कारी किंवा दरोडेखोर आहेत का की त्यांना कोल्हापुरात जाण्यास मनाई करण्यात आलीय? असा सवाल करत रोष व्यक्त केला.

कोल्हापुरात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक

दुसरीकडे कोल्हापुरात पोलीस प्रशासनाची बैठक सुरु झाली. किरीट सोमय्या कोल्हापुरात आले तर कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्यात बैठक सुरु आहे. सोमय्या यांना नेमकं कुठे ताब्यात घेणार याबाबत गुप्त माहिती ठेवण्यात आली आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

या सगळ्या घडामोडी घडत असताना कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला. सोमय्या खरंच कोल्हापुरात आले तर त्यांना कोल्हापुरी पायतण दाखवून हिसका देवू, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी इशारा दिला.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात हे चालले तरी काय?…. देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

किरीट सोमय्यांचे चार दिवसांत चार मोठे दौरे, कोणाकोणाचा करणार करेक्ट कार्यक्रम ?

संबंधित व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.