Chandrashekhar Bawankule : अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलले, ‘हे योग्य नाही, एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी’
Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर दिली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मी आणली, माझी संकल्पना आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, त्यावर बावनकुळे यांनी उत्तर दिलं.

“संभाजी नगर येथील उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांचा काल प्रवेश झाला. आज 15 सरपंच आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी अस्वस्थ आहेत. प्रमुख नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर लोटांगण घालत आहेत. दोन-तीन वर्षात उद्धव ठाकरेंना नगरपालिका, जिल्हा परिषद लढावायला देखील माणसं मिळणार नाहीत. आजचा पक्ष प्रवेश भाजपला उभारी देणारा असेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “भाजपच मिशन पहिल्या पासून सुरु होतं. लोकसभेत आम्ही महाविजय मिळवला. विधानसभेत महाविजय मिळवला. 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लढणार आहोत. विधानसभेत चांगलं यश मिळालं, तसच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश मिळेल” असा विश्वास मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या वादामुळे छत्रपती संभाजी नगरमध्ये पक्ष प्रवेश सुरु आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
त्यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “त्यांच्या वादामुळे नाही, तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी युती केली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या विचारांशी संगनमत केलं” “मतांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसचे विचार स्वीकारले. उद्धव ठाकरेंच्या परभणी आणि नाशिकमधील रॅलीत पाकिस्तानी ध्वज फडकताना कार्यकर्त्यांनी बघितले. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. म्हणून हे पक्ष प्रवेश सुरु आहेत” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राजन साळवींच्या प्रश्नावर काय उत्तर दिलं?
ठाकरे गटातील नेते राजन साळवी भाजपत कधी प्रवेश करणार? या प्रश्नावरही बावनकुळे यांनी उत्तर दिलं. “माझी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. एखाद्यावेळी साळवी यांचा विचार बदलू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर ते नाराज आहेत. मी त्यांच्याशी बोललेलो नाही. चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे यांची काँग्रेसधार्जिणी विचारधारा कोणाला मान्य नाही” असं चंद्रशेखर बावनुकळे बोलले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच क्रेडिट घेण्यावर म्हणाले?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मी आणली, माझी संकल्पना आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, त्यावर बावनकुळे म्हणाले की, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात आली. महायुतीच सरकार असताना आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं. मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख असतात. त्यामुळे ते म्हणत असतील, मी योजना आणली, तर त्यात काही गैर नाही”
‘रस्त्यावरील प्रदर्शने योग्य नाहीत’
म्हाडचे आमदार भरत गोगावले यांच्या समर्थकांनी पालक मंत्रीपदावरुन प्रदर्शन केलं. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोललेत. “अशी प्रदर्शने त्या पक्षाच्या नेतृत्वाने थांबवली पाहिजेत. रस्त्यावरील प्रदर्शने योग्य नाहीत. नाशिकमधील भाजपची प्रदर्शने आम्ही रोखली. एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी” असं चंद्रशेखर बावनकुळे बोलले.