BMC Election 2025 : मुंबईत ठाकरे-मनसे युतीपुढे बंडखोरांचेच आव्हान, तोडगा कसा काढणार? अमित ठाकरे म्हणाले…
मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर भाष्य केले. काहीही झाले तरी मुंबईचा महापौर मराठी माणूसच असेल, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी बंडखोरांविषयीही भाष्य केले.

BMC Election : राज्यात एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी आजच्या शेवटच्या दिवशी शेकडो इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर प्रचाराचा धुरळा उठणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पिंपरी चिंचवड यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांत जोमात प्रचार केला जाणार आहे. विशेष म्हणजे पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे काही इच्छुकांनी बंडखोरी करत थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळेच काही ठिकाणी सत्तेत असणाऱ्या तसेच सध्या विरोधी बाकावर असलेल्या पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. मुंबईत महानगरपालिकेत ठाकरे गट आणि मनसेची युती आहे. या युतीची सध्या राज्यभरात चर्चा आहे. असे असले तरी पक्षादेश झुगारून मुंबईत ठाकरे गट तसेच मनसेच्या अनेक स्थानिक नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे आता मुंबईत बंडखोरांना थांबवण्याचे आव्हान ठाकरे गट-मनसेच्या युतीपुढे उभे ठाकले आहे. याच बंडखोरांविषयी तसेच मुंबईच्या महापौरपदाविषयी मनसेचे नेते तथा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक आम्हाला सोडून गेले आहेत, त्यांना पश्चात्ताप होईल, असं मत अमित ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
आमच्यातील बंडखोर ऐकायला तयार आहेत
काल आमचे उमेदवार जाहीर झाले होते. आज त्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आमचे जिथे-जिथे उमेदवार आहेत तिथल्या प्रत्येक शाखेला आम्ही भेट देणार आहोत. बंडखोरीचे प्रकार सर्वच ठिकाणी होत असतात. आमच्याकडे ज्या लोकांनी बंडखोरी केली आहे, ते समजदार आहेत. आम्हाला पक्षासाठी तसेच मराठी माणसासाठी पुढे जायचे आहे. आमचे लोक ऐकायला तयार आहेत, असे सांगत बंडखोरांची मनधरनी केली जाईल, असे अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच भाजपामध्ये मात्र ज्यांनी बंडखोरी केली आहे, ते भाजपाची कार्यालये फोडत आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.
मुंबईचा महापौर मराठी माणसूच होणार
पुढे अमित ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदावर बोलताना काहीही झालं तरी मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार, असे त्यांनी ठासून सांगितले. तसेच जागावाटपावर भाष्य करताना जागावाटपादरम्यान मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना भेटलो होतो. मराठी माणसांसाठी ईगो बाजूला ठेवू, असे या दोघांचेही मत होते. मराठी माणसांसाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे दोघांचेही मत होते. दोघांमध्ये ती समज आहे, असे भाष्य अमित ठाकरे यांनी केले.
