एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा होण्यापूर्वीच डाव साधला, मोठी बातमी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार आहे. मात्र त्यापूर्वी आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

निवडणूक आयोगाकडून राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती करणार आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती करणार आहेत, समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भातील चर्चा ही अंतिम टप्प्यात असून, या संदर्भात आता लवकरच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढवणार आहेत, मात्र यासंदर्भात अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये.
तर दुसरीकडे मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई व माजी नगरसेविका कस्तुरी देसाई हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. निधीअभावी विकासकामे रखडल्याने मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 20 वर्षांच्या कार्यानंतरही दुर्लक्ष होत आहे, असं म्हणत यावेळी कौस्तुभ देसाई यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.
तर याचवेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला देखील धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी निवडणूक प्रचार प्रमुख सचिन पोटे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका जानवी पोटे हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कल्याण पूर्वेतील कै. दादासाहेब गायकवाड क्रीडागणात शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मनसे आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
