मुंबई: राज्याच्या राजकारणात आज प्रचंड ट्विस्टवर ट्विस्ट आले. आधी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुख्यमंत्री होणार असल्याचं वाटत होतं. पण मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते सत्तेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचं सांगितलं जात होतं. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांनी एक ट्विट करून फडणवीसांना सत्तेत सहभागी होण्याचे आदेश दिला. पंतप्रधानांनी दोनदा फोन केला. अमित शहा यांनीही ट्विट केलं. त्यामुळे फडणवीसांचा जो मास्टर स्ट्रोक होता, तो त्यांच्यावरच उलटल्याचं स्पष्ट झालं. नड्डा, मोदी आणि शहा यांचाच हा मास्टरस्ट्रोक असल्याचं दिसून आलं. अवघ्या तीन तासातच संपूर्ण खेळी उलटली. फडणवीसांना अनिच्छेने मंत्रिमंडळात जावं लागलं आणि दुय्यम खात्यावर समाधान मानावं लागल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास गोव्यावरून मुंबईला आले. मुंबईत येताच शिंदे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले. यावेळी त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली.
ही पत्रकार परिषद सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आपण सहभागी होणार नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे यांचा हा मास्टर स्ट्रोक असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक व्हिडिओ व्हायर केला. त्यात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं असं आवाहन करण्यात आलं. त्यानंतर फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपद घेणार का? याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच जेपी नड्डा यांनी ट्विट करून फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत असल्याचं जाहीर केलं.
नड्डा यांच्या ट्विटनंतर लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ट्विट आलं. फडणवीस उपमुख्यमंत्री होत असल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं. एकापाठोपाठ एक दोन बड्या नेत्यांनी ट्विट केल्याने फडणवीसांवर दबाव आला आणि त्यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हावं लागलं.
फडणवीस यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नव्हतं. आपण मुख्यमंत्री होतो. त्यामुळे पुन्हा खालच्या पदावर कशाला जायचं अशी त्यांची भूमिका होती. मात्र, पक्षाच्यावतीने त्यांच्यावर दबाव वाढत होता. शिंदे मंत्रिमंडळावर भाजपचा वचक राहिला पाहिजे. तसेच महत्त्वाचे निर्णय घेताना ते पटकन घेता आले पाहिजे, यासाठी पक्षश्रेष्ठींना फडणवीस मंत्रिमंडळात हवे होते. पण फडणवीस तयाला तयार नव्हते. त्यामुळे शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फडणवीसांना दोनदा फोन करावा लागला. त्यामुळे फडणवीस यांना नाही म्हणता आलं नाही आणि त्यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.