मोदींचं तोंडही पाहायचं नाही, केंद्र सरकारची कसलीच मदत नको : ममता बॅनर्जी

मोदींचं तोंडही पाहायचं नाही, केंद्र सरकारची कसलीच मदत नको : ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धचा राजकीय राग शासकीय कामातही काढताना दिसत आहेत. मोदींनी फनी वादळाचा आढावा घेण्यासाठी केलेला फोन ममता दीदींनी घेतला नाही. त्यानंतर आता मोदींना आपण पंतप्रधान समजत नसून त्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नाही, असं ममता दीदींनी म्हटलंय.

पश्चिम बंगालमधील एका सभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या. मी त्यांना (मोदी) पंतप्रधान समजत नाही. म्हणून मी बैठकीलाही बसले नाही. मला त्यांना कोणत्याच व्यासपीठावर एकत्रितपणे पाहण्याची इच्छा नाही. मी पुढच्या पंतप्रधानाशी बोलेन. आम्ही सायक्लोनसारख्या वादळांची काळजी घेऊ शकतो. निवडणुका चालू असताना आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज नाही, असं ममता म्हणाल्या.

नुकत्याच आलेल्या फनी वादळामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागात मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली आणि सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. शिवाय त्यांनी ओदिशाची हवाई पाहणीही केली. मोदींनी ममता बॅनर्जींनाही फोन केला होता, पण त्या दौऱ्यावर असल्याचं सांगून बोलण्यास नकार देण्यात आल्याचं खुद्द मोदींनीच सभेत सांगितलं होतं.

फनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची मोदींनी हवाई पाहणी केली. यावेळी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मोदींचं विमानतळावर स्वागत केलं. शिवाय नवीन पटनायक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीलाही मोदींची उपस्थिती होती.

ओदिशासाठी एक हजार कोटींची तातडीची मदत जाहीर

मोदींनी हवाई पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारने एक हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. यापूर्वीही राज्य सरकारला 341 कोटी रुपये देण्यात आले होते. यापुढेही लागेल ती मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलंय. केंद्र सरकार फक्त मदत देण्यासाठीच नाही, तर ओदिशातील पायाभूत सुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठीही बांधील आहे, असंही मोदी म्हणाले. ओदिशा सरकारने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या पद्धतीने या वादळाचा सामना केला त्याचं मोदींनी कौतुक केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI