Pratap Sarnaik ED Live | प्रताप सरनाईक आणि मुलगा विहंगची एकाचवेळी चौकशी

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून आज आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची एकत्र चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी छापेमारीवेळी प्रताप सरनाईक घरी नव्हते. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास प्रताप सरनाईक प्रसारमाध्यमांसमोर आले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:50 AM, 25 Nov 2020

मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची आज सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी मार्फत चौकशी केली जाणार आहे. तत्पूर्वी काल ईडीकडून प्रताप सरनाईक यांचं घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. त्यावेळी ईडीकडून विहंग सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांचीही चौकशी करण्यात आली. ईडीने टाकलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काल ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यावर प्रताप सरनाईक तिथे नव्हते. त्यामुळे आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून सरनाईक यांना समन्स बजावण्यात आलं आहे. (Pratap Saranaik and Vihang Saranaik will be interrogated jointly by the ED)

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून आज आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची एकत्र चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी छापेमारीवेळी प्रताप सरनाईक घरी नव्हते. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास प्रताप सरनाईक प्रसारमाध्यमांसमोर आले. तत्पूर्वी त्यांची आणि खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात दीड तास बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी बैठकीतील चर्चेविषयी मौन बाळगलं. ‘ईडी’ने नक्की का कारवाई केली, माझ्या मुलाला का ताब्यात घेतले, याची माहिती मीदेखील अजून घेत असल्याची मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिवसेना भक्कमपणे सरनाईकांच्या पाठीशी

प्रताप सरनाईक यांच्या ईडीनं केलेल्या कारवाईचा शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तुम्ही सुरुवात केली आता शेवट आम्ही करु, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन हे सरकार दबावाखाली येईल, असे कोणाला वाटत असेल, तर ते मूर्खाच्या नंदनवनात फिरत आहे. सीबीआय ईडी काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू, हे सरकार पुढील चार वर्ष नाही, तर त्यापुढे जाऊन हे सरकार कायम राहील,” असेही संजय राऊत म्हणाले.

‘ईडीने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!’

ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं तळ ठोकला तरी आम्ही घाबरणार नाही, अशा इशाराच राऊत यांनी दिला आहे. ‘प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणजे नामर्दानगी आहे. दिल्लीतूनच नाही तर इंटरपोलची टीम आली तरीही काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई केली तरी आम्ही घाबरत नाही’, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

चौकशीला सामोरे जा, घाबरायचं काय कारण? – भाजप

काही चूक केली नसेल तर चौकशीला घाबरण्याचं कारण काय, असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारला जात आहे. तर दुसरीकडे राणे पिता-पुत्रांनी सरनाईकांच्या मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं. ईडीचा तपास अजून खोलवर झाला तर बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचं काही झालं असेल म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे”, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेवर जोरदार प्रहार केलाय. “ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं विद्यापीठ आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे शहर आणि जिल्ह्यात चालतात. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत”, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

जेवढ्या चौकशा करायच्या तेवढ्या करा, महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा; राऊतांचा इशारा

Exclusive: प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात भेट; दीड तास गुप्त चर्चा

Pratap Saranaik and Vihang Saranaik will be interrogated jointly by the ED