शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली भाजपच्या दोन मंत्र्यांची भेट, कारण…
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या एका खासदाराने भाजपच्या मंत्र्यांची भेटी घेतली आहे.

Nilesh Lanke Meet Nitin Gadkari Ashwini Vaishnaw : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या एका खासदाराने भाजपच्या मंत्र्यांची भेटी घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी नुकतंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यामुळे सध्या निलेश लंके चर्चेत आले आहेत.
“लवकरात लवकर रेल्वे वाहतूक सुरु करावी”
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीच्या प्रश्नांवर चर्चा केली. संभाजीनगर ते पुणे या रेल्वे मार्गावर लवकरात लवकर रेल्वे वाहतूक सुरु करावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली.
“संभाजीनगर ते पुणे या मार्गावर अनेक महत्त्वाची देवस्थाने आणि एमआयडीसी आहेत. त्यामुळे या रेल्वेच्या माध्यमातून या मार्गाला जोडता येईल. तसेच ही रेल्वे सुरू झाली तर वाहतूक आणि औद्योगीकरण करणे सोप होईल, असेही निलेश लंके यांनी म्हटले. गेल्या अनेक वर्षांपासून हा रेल्वे महामार्ग रखडला आहे. माझ्या आधीच्या लोकप्रतिनिधींनी हे का केलं नाही, हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी आता तो प्रश्न मार्गी लावणार आहे”, असेही निलेश लंकेंनी सांगितले.
“रेल्वे प्रश्नावर मंत्रीही सकारात्मक”
“मला या रेल्वे प्रश्नावर मंत्रीही सकारात्मक वाटले. त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेतली. तसेच हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल हे आम्ही पाहू”, असे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले.
“यासोबतच निलेश लंकेंनी रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून शिर्डी-नगर रस्त्यासाठी आंदोलन केले जात आहे. हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. याबद्दल मी नितीन गडकरींची भेट घेतली. त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यांनी ठेकेदाराला ब्लँक लिस्ट करुन काम सुरु केलं जाईल”, अस आश्वासन मला दिले.
“त्यासोबतच शिरुर ते संभाजीनगर हा रस्तादेखील सहा पदरी व्हावा, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. यावर नितीन गडकरींनी पाठपुरावा केल्यावर याबद्दल भाष्य करु, असे मला सांगितले”, असेही निलेश लंके म्हणाले.
