‘ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल’, पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

लातूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय. ओबीसींचं आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका, असा इशारा पंकजा यांनी दिलाय.

'ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल', पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडे यांचा राज्य सरकारला इशारा

लातूर : ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय. ओबीसींचं आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका, असा इशारा पंकजा यांनी दिलाय. त्याचबरोबर मराठा आरक्षणालाही आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. लातूरमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात मोठ्या संख्येनं भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी धनंजय मुंडेंवरही टीका केलीय. (Pankaja Munde warns Mahavikas Aghadi government over OBC reservation)

ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका. ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे. तर यातून काही सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय…आम्ही मुंबईत 10 लाख लोकं बोलवू शकतो. आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो ही एक दिवस येईल. ओबीसी शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

मराठा आणि ओबीसी समाजात वाद पेटवण्याचं पाप जर कुणी करत असेल तर आम्ही त्यालासुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही. ही आज माझी खंबीर भूमिका आहे. आमच्यामध्ये तुकडे पाडायची काही गरज नाही. एक वज्रमूठ आम्ही बनवू. ही बहुजनांची लढाई सामान्य माणसांसाठी असल्याचंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलिही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलिही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत, आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असा घणाघाती आरोप केला होता.

धनंजय मुंडेंवर घणाघाती हल्ला

बीड जिल्ह्यात जनता, व्यापारी, व्यावसायिक प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. वाळूमाफिया वाढले आहेत. अवैध दारु, मटक्याचे अड्डे वाढले आहेत. आम्ही रोज पोलिसांना बोलतोय. हे सर्व बीड जिल्ह्यासाठी हानीकारक आहे, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; तर बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचाच विषय, ओबीसी चिंतन बैठकीत पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार

Pankaja Munde warns Mahavikas Aghadi government over OBC reservation

Published On - 7:38 pm, Sat, 14 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI