Aditya Thackeray | शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, भिवंडीत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

आमदारांना खरच सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांनी जनतेत जाऊन निवडणुका लढवाव्यात असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.

Aditya Thackeray | शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, भिवंडीत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Image Credit source: twitter
गणेश थोरात

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jul 21, 2022 | 3:22 PM

मुंबईः शिवसेनेशी गद्दारी करत स्थापन झालेलं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि फडवणीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार एक दिवस कोसळणारच आहे, असा हल्लाबोल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला. भिवंडीत आज शिवसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा दोन गटात फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यभरात शिवसेनेचे मेळावे आयोजित केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक आणि भिवंडी येथे शिवसैनिकांना संबोधित केलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून आलेलं सरकार फार काळ टिकणार नाही. शिंदे गटातील लोकांनी पक्षाशी किंवा शिवसेनाप्रमुखांशीच गद्दारी केली नाही तर माणुसकीशी गद्दारी केली. राजकारणाची पायरी सोडली, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तसेच शिवसेनेच्या बळावर निवडून आलेल्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत उतरून दाखवावे, असं आव्हानही त्यांनी दिलं.

‘ही तर माणुसकीशी गद्दारी’

भिवंडीत शिवसैनिकंना उद्देशून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ एकनाथ शिंदे आणि त्यांचे मित्र बसलेत दिल्लीत. महाराष्ट्रात पूर आलाय. तिकडून त्यांची वेगळीच कामं सुरु आहेत. युवासेनेला धमकी द्या, कुणी येतंय का पहा. महिला आघाडीला धमकी द्या, कुणी येतंय का पहा.. पण माझ्यासमोर उभे राहिलेले कुणी घाबरत नाहीत. हे शिवसैनिक आहेत. घाबरणारे असते तर सूरतेला, गुवाहटीत आले असते. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये शाश्वत विकास सुरु होता. जगभरात महाराष्ट्राचं नाव उद्धव ठाकरेंनी बलुंद केलं.  चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं. उद्धव साहेबांसारख्या चांगल्या लोकांसाठी राजकारण आहे. गद्दारी झाली आहे, ही राजकीय गद्दारी नाही. ही माणुसकीशी गद्दारी झाली आहे. ज्या मिनिटाला पक्षप्रमुख हॉस्पिटलमध्ये जातात. दोन ऑपरेशन झालेत. ज्या आठवड्यात ते बेडवरून हलू शकत नव्हते. दोन महिने ते कुणाला भेटू शकले नाहीत. तरीही मंत्रिमंडळाची कामं व्हॉट्सअपवर , फोनवर करत होते. गद्दारांची वृत्ती कशी असते बघा.. ते बेडवर असताना यांच्या डोक्यात मी मुख्यमंत्री होऊ शकतो का हे विचार आले, यासाठी हालचाली सुरु झाल्या. याला निष्ठावंत म्हणतात का? आज बाळासाहेब ठाकरे किंवा दीघे साहेब असते तर यांना काय न्याय दिला असता? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

‘सरकार कोसळणारच’

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं हे सरकार घटनाबाह्य असून ते कोसळणारच, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. फुटीर आमदारांना उद्देशून ते म्हणाले, ‘
बंड करायला हिंमत लागते. आज सगळे आम्हाला येऊन भेटत आहेत. कारण उद्धव ठाकरे सच्चा माणूस आहे. बंडखोर स्वतःला शूरवीर समजत आहेत. पण बंड करताना पक्षप्रमुखांशी बोलायची हिंमत नव्हती. त्यांच्यावर दडपण असतील. महाराष्ट्रात राहून बंड करण्याची हिंमत दाखवायची असती… गुवाहटीत पूर आलेला तेव्हा या 40 लोकांनी मजा मारून आले.. पण आमदार आणि खासदारांनी लोकांमध्ये फिरावं. त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं. जनता जे ठरवेल, ते आम्हाला मान्य असेल. जर तुम्हाला परत यायचं असेल. शिवसैनिक म्हणून ज्यांना परत यायचंय त्यांच्यासाठी मातोश्रीची दारं उघडी आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आलाय. लोकं त्रस्त आहेत. पण दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे, ते घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें