भाजपविरोधातील महाआघाडीचा चेहरा कोण? सुशीलकुमार शिंदे म्हणतात…

भाजपविरोधातील महाआघाडीचा चेहरा कोण? सुशीलकुमार शिंदे म्हणतात...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार आहे. मात्र, महाआघाडीचा चेहरा अजूनही अस्पष्टच आहे. यावर बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “महाआघाडीचा चेहरा निवडणुकीनंतर बहुमतानं ठरेल. महाआघाडीकडे चेहरा नाही, चेहरे आहेत.” सुशीलकुमार शिंदे पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

“राज्यातील आघाडीच्या जागावाटपाची चर्चा चालू आहे. जागावाटपात भांडण नसून संवाद सुरु आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर चांगले गृहस्थ असून आमच्याबरोबर बैठक झालीय. आंबेडकर यांना जागा द्यायला तयार असून बोलणी सुरु आहे.”, अशी माहिती सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. तर मला पक्षानं तिकीट दिले तर मी निवडणूक लढायला तयार असल्याचंही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं, “भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष घटकांना एकत्र लढावं लागणार आहे. देशपातळीवर महाआघाडीत बावीस ते चोवीस पक्ष एकत्र येत आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसला वाळीत टाकलं असलं, तरी ते धर्मनिरपेक्ष असून एकत्र येतील.”

“राममंदिर आणि मशिदीचं राजकारण करुन राममंदिर बांधावं, हे योग्य नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं. “एनडीए सरकार भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर काहीच कारवाई करत नाहीय. पंतप्रधान भ्रष्ट मंत्र्यांना खुर्चीजवळ घेऊन बसत असून, ते निगरगट्ट बनले आहेत.” असा आरोपही सुशीलकुमार शिंदेंनी केला. काँग्रेस सरकार असताना मंत्र्यांवर आरोप झाल्यावर राजीनामा घेतल्याचेही शिंदेंनी नमूद केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI