ठाकरे गटाला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंच्या जवळच्या माजी नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटातून तीन वेळा नगरसेवक झालेल्या संध्या दोशी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Sandhya Doshi Join Eknath shinde Group : येत्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यातच आता अनेक पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरु झाले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटातून तीन वेळा नगरसेवक झालेल्या संध्या दोशी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
सलग तीन वेळा नगरसेविका
मुंबईतील कांदिवली चारकोप भागातील माजी नगरसेविका संध्या दोशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. संध्या दोशी यांनी मशाल सोडत धनुष्यबाण हाती घेतला आहे. संध्या दोशी या मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षण समिती अध्यक्षा आहेत. संध्या दोशी या सलग तीन वेळा चारकोप वार्ड 18 च्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
माझी उद्धव ठाकरेंविरोधात कोणतीही नाराजी नाही – संध्या दोशी
संध्या दोषी या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या मानल्या जातात. मात्र आता संध्या दोशी या त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यावेळी संध्या दोशींसोबत दोन माजी शाखाप्रमुख शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मी शिंदे गटाच्या शिवसेनेत जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन. माझी उद्धव ठाकरेंविरोधात कोणतीही नाराजी नाही, असे संध्या दोशी यांनी स्पष्टपणे सांगितले.
“…म्हणून मी आज हा निर्णय घेतला”
एकनाथ शिंदेंच्या यांच्या शिंदे गटात पक्षप्रवेश करण्यापूर्वी संध्या दोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात मुंबई महापालिकेवर जे प्रेम केलं, त्यांनी जी कामे केली आहेत त्या कामाने प्रेरित होऊन मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. आज सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. मला या कामाबद्दल एकनाथ शिंदेंचा अभिमान वाटतो. त्यामुळे मी आज हा निर्णय घेतला आहे, असे संध्या दोशी म्हणाल्या.
कोण आहेत संध्या दोशी?
- मुंबईतील कांदिवली चारकोप भागातील वार्ड क्रमांक 18 च्या माजी नगरसेविका
- मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षण समिती अध्यक्षा
- सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून काम
- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या मानल्या जातात
