Astrology 2023 : सूर्य आणि शनिमुळे तयार होणार समसप्तक राजयोग, तीन राशींच्या अडचणीत होणार वाढ
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती बरंच काही सांगून जाते. कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित आहे यावर घडामोडी अवलंबून असतात. आता सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे समसप्तक राजयोगाची स्थिती निर्माण होणार आहे.

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या एका विशिष्ट स्थितीमुळे समसप्तक राजयोग तयार होतो. हा एक दुर्लभ योग गणला जातो. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 180 डिग्रीमध्ये असतील तेव्हा हा योग जुळून येतो. म्हणजेच दोन्ही ग्रहांच्या राशी स्थितीत सारखंच अंतर पाहायला मिळतं. सूर्य आणि शनिच्या स्थितीमुळे समसप्तक राजयोग तयार होणार आहे. सूर्यदेव सिंह राशीत असणार आहे. तर शनिदेव अडीच वर्षांसाठी कुंभ राशीत विराजमान आहेत. दोन्ही ग्रहांमध्ये एकमेकांपासून सात राशींचं अंतर आहे. सिंह ते कुंभ आणि कुंभ ते सिंह एकमेकांपासून सात राशींचं अंतर आहे. तसं पाहिलं तर समसप्तक योग शुभ गणला जातो. पण सूर्य आणि शनि यांच्यातील नातं हवं तसं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. लोकांमध्ये विनाकारण वाद विवाद होतील. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना सांभाळून राहावं लागणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत
या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
कर्क : या राशीच्या जातकांवर शनिची अडीचकी सुरु आहे. त्यात शनि आणि सूर्याच्या समसप्तक स्थितीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विनाकारण कामाचा तणाव सहन करावा लागेल. तसेच कोणत्याही कामनात मन लागणार नाही. प्रेम प्रकरणात मोठा फटका बसू शकतो. कौटुंबिक वाद डोकं वर काढतील. तसेच आर्थिक स्थितीही अनुकूल नसेल. त्यामुळे अडचणीत मोठी वाढ होईल. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवा.
कन्या : या राशीच्या जातकांना संमिश्र प्रतिसाद मिळेल. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढतील. मिळणारं उत्पन्न आणि खर्च याची सांगड बसणार आहे. उगाचच पैसा खर्च होत असल्याने हतबल व्हाल. हॉस्पिटल आणि शैक्षणिक कामासाठी पैसा खर्च करावा लागेल. त्यामुळे बचत करण्यासोबत मेडिक्लेम आणि एखादी शैक्षणिक पॉलिसी घ्या. त्यामुळे तुमची अडचण कमी होऊ शकते. आपल्या गरजा पाहूनच पैसा खर्च करा.
मकर : या राशीच्या जातकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे समसप्तक योगामुळे अडचणीत वाढ होईल. काही गोष्टींमुळे विनाकारण अडकत जाल आणि आर्थिक नुकसान होईल. जोडीदाराकडून हवी तशी साथ मिळणार नाही. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तब्येत साथ देत नसेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. उसनवारी करण्याची वेळ येईल. त्यामुळे गरजेच्या वेळी मदत करेल अशी व्यक्ती मिळणं कठीण होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
