आधी ममता कुलकर्णीला विरोध, आता धर्मांतराची धमकी; हिमांगी सखी यांनी उडवली खळबळ
महाकुंभात किन्नर आखाड्यात सुरू असलेल्या वादामुळे महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी सनातन धर्म सोडण्याची धमकी दिली आहे. कल्याणी नंद गिरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे किन्नर आखाड्यातील वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र झाली आहे.

महाकुंभ किन्नर आखाड्यातील वाद थांबताना दिसत नाहीये. आता आखाड्यातील एक नवा वाद समोर आला आहे. किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी एक विधान केलं आहे, त्यानंतर नव्या वादाला फोडणी बसली आहे. आखाड्यात सुरू असलेल्या वादामुळे वैतागलेल्या हिमांगी सखी यांनी किन्नर आखाडाच नव्हे तर सनातन धर्मच सोडण्याची धमकी दिली आहे. आखाड्यातील वाद आता सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे. त्यामुळे मी लवकरच धर्मांतर करण्याचा विचार करणार आहे, असं हिमांगी सखी यांनी म्हटलं आहे.
महामंडलेश्वर कल्याणी नंद गिरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी ही धमकी दिली आहे. माझ्यावर हल्ल्याचा आरोप आहे. पण माझा या हल्ल्याशी काडीचाही संबंध नाहीये, असं हिमांगी सखी यांनी म्हटलं आहे. यापूर्वी हिमांगी यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. आपल्यावर खुद्द किन्नर आखाड्याची आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी हल्ला केला होता, असा आरोपच हिमांगी सखी यांनी केला होता.
धर्मांतराची धमकी
किन्नर आखाड्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ही लढाई लवकरात लवकर संपली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. जर हा वाद लवकरात लवकर संपुष्टात आला नाही तर मला आखाड्यातून आणि सनातन धर्मातून बाहेर पडण्याबाबत विचार करावा लागेल, असंही त्यांनी म्हटलंय. म्हणजे हिमांगी सखी यांनी थेट धर्मांतर करण्याची धमकी दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर बनवल्यानंतर पहिल्यांदा किन्नर जगदगुरू महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी त्याबाबत सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर हिमांगी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.
नॉनव्हेज आणि दारू
हिमांगी सखी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. आपल्यावर आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा दावा हिमांगी यांनी केला होता. या सर्व वादानंतर ममता कुलकर्णीने महामंडलेश्वरपद सोडलं होतं. पण तिने हे पद स्वीकारलं होतं. त्याचीही खिल्ली उडवण्यात आली होती. लोकांचा धर्म आणि शास्त्राशी काहीच संबंध राहिला नाही. फक्त दिखाऊपणा आहे. या लोकांनी सनातन धर्माचीही खिल्ली उडवली आहे. किन्नर आखाड्यात मांस मदिरेचं सेवन केलं जात आहे. अनेक लोक दारूच्या नशेतच शिबिरात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता.
