Breaking : जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दिएगो मॅरेडोना हे फुटबॉल विश्वातील सार्वकालिन महान खेळाडुंपैकी एक होते.

Breaking : जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ब्युनोस आयरिस: जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना (Diego Maradona ) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, दिएगो मॅरेडोना यांना राहत्या घरी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांची ब्रेन सर्जरी झाली होती. यावेळी त्यांच्या मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठी हटवण्यात आल्या होत्या. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांना राहत्या घरी पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.  (Argentina soccer superstar Diego Maradona passed Away)

दिएगो मॅरेडोना हे फुटबॉल विश्वातील सार्वकालिन महान खेळाडुंपैकी एक होते. दिएगो मॅरेडोना यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलविश्वात पदार्पण केले. यानंतर अल्पावधीतच त्यांची गणना जगातील लोकप्रिय फुटबॉलपटूंमध्ये होऊ लागली होती.

दिएगो मॅरेडोना यांनी आपल्या कौशल्याने फुटबॉलविश्वात अर्जेंटिनाच्या संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांनी चार विश्वचषक स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 1986 मध्ये दिएगो मॅरेडोना यांच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने पश्चिम जर्मनीचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. याशिवाय, बार्सिलोना आणि नेपोली या क्लब्समधूनही ते व्यावसायिक फुटबॉल खेळले होते. मॅरेडोना यांनी नेपोली क्लबला दोनवेळा Serie A हा किताब जिंकवून दिला होता. त्यांनी 91 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 गोल्स केले होते.

फुटबॉलविश्वात अनेक नव्या खेळाडुंसाठी मॅरेडोना हे आदर्श होते. त्यांना फिफाचा प्लेअर ऑफ दी सेंचुरी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध केलेला गोल ‘हॅड ऑफ गॉड’ म्हणून ओळखला जातो. तर त्याच सामन्यात सहा खेळाडूंच्या मधून चेंडू बाहेर काडून केलेल्या गोलला ‘द गोल ऑफ द सेंचुरी’ असे म्हटले जाते.

दिएगो मॅरेडोना मैदानाबाहेरही अनेक कारणांमुळे गाजले. 1991 साली डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर मॅरेडोना यांना 15 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. २००८ मध्ये ते अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाले होते.

(Argentina soccer superstar Diego Maradona passed Away)