Bengaluru Stampede : विराट कोहलीला झटका, पोलिसांमध्ये तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
Virat Kohli Complaint : आरसीबीच्या विजयानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. या दुर्घटनेनंतर आता विराटच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बंगळुरूत 4 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी जल्लोषाला गाळबोट लागलं. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेल्या 11 क्रिकेट चाहत्यांचा एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत दुर्देवी मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात आतापर्यंत बंगळुरुतील पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर आरसीबीच्या मार्केटिंग हेडलाही अटक करण्यात आली. त्यानंतर आता आरसीबीचा स्टार बॅट्समन विराट कोहली याला मोठा झटका लागला आहे. विराट विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच विराटवर आता गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच एम वेंकटेश यांनी विराट कोहली विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात विराटविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरसीबीच्या विजयाला गाळबोट
रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3 जून रोजी 18 व्या मोसमातील अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफी जिंकली. आरसीबीने या विजयासह 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली आणि इतिहास घडवला. आरसीबीच्या विजयानंतर 18 व्या तासालाच 4 जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या विजयी जल्लोषासाठी चाहत्यांना फ्री एन्ट्री ठेवण्यात आली. एम चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता 30-35 हजार इतकी आहे. मात्र क्षमतेपेक्षा जास्त चाहते आले. त्यामुळे स्टेडियम पूर्णपण भरलं.
स्टेडियम पूर्ण भरल्यानंतर गेट बंद करण्यात आलं. मात्र त्यानंतरही चाहत्यांना आत जायचं होतं. त्यामुळे गेटवरील सुरक्षारक्षक आणि चाहत्यांमध्ये संघर्ष झाला. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे आरसीबीच्या विजयी जल्लोषाला गाळबोट लागलं.
गुन्हा दाखल, अटकेची कारवाई
चाहत्यांच्या मृत्यूनंतर आरसीबी, केएससीए आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजयी जल्लोषाच्या आयोजनात हलगर्जीपणा केल्याचं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं. त्यानंतर 6 जून रोजी सकाळी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाले याला अटक करण्यात आली. तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तिघांनाही अटक करण्यात आली. या चौघांची कसून चौकशी केली जात आहे. तर त्यानंतर आता विराटविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. विराटविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जात आहे. आता विराटवर गुन्हा दाखल होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
