Asia Cup 2025 : आयपीएलमधील कडक कामगिरीनंतरही आशिया कपसाठी 5 खेळाडूंना डच्चू;निवड समिती मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
Asia Cup 2025 : भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंनी काही महिन्यांपूर्वी खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या 18 व्या मोसमात धमाकेदार बॅटिंग करत खोऱ्याने धावा केल्या होत्या. मात्र त्यापैकी 5 खेळाडूंना आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. यूएईमधील दुबई आणि अबुधाबीतील स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. आगामी टी 20i वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. आतापर्यंत आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात संघ जाहीर होणार हे निश्चित आहे. मात्र या स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू? याची उत्सूकता चाहत्यांना आहे. निवड समिती आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या 5 खेळाडूंचा आशिया कप स्पर्धेत समावेश करणार नसल्याचं म्हटलं जात आहे. ते 5 खेळाडू कोण असू शकतात? हे जाणून घेऊयात.
केएल राहुल
केएल राहुल याने आयपीएलच्या 18 व्या हंगामात दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळताना 13 सामन्यांमध्ये 149.72 च्या स्ट्राईक रेटने एकूण 539 धावा केल्या. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात विकेटकीपर म्हणून कुणाला संधी द्याची? हा निवड समितीसमोर मोठा पेच आहे. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल हे प्रबळ दावेदार असल्याने निवड समितीसमोर कुणा संधी द्यायची आणि कुणाला नाही? हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. केएलने 2022 मध्ये अखेरचा टी 20i सामना खेळला होता.
यशस्वी जैस्वाल
यशस्वी जैस्वाल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो. यशस्वीने 18 व्या मोसमात 14 सामन्यांमध्ये 159.71 च्या सरासरीने 559 धावा केल्या. यशस्वी 18 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा सातवा फलंदाज होता. यशस्वी भारतासाठी ओपनिंग करतो. मात्र गेल्या काही मालिकांमध्ये भारतासाठी सातत्याने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी ओपनिंग करत आहे. तसेच शुबमन गिल हा देखील ओपनर म्हणून शर्यतीत आहे. तर यशस्वीला कसोटीसाठी प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे यशस्वीला विंडीज विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धेतून विश्रांती दिली जाऊ शकते.
श्रेयस अय्यर
कर्णधार श्रेयस अय्यर याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात पंजाबला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र पंजाबला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. श्रेयसने या हंगामात 650 धावा केल्या. श्रेयस मिडल ऑर्डरमध्ये खेळतो. मात्र भारतीय संघात मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या असे अनेक फलंदाज आहेत. त्यामुळे श्रेयसबाबत निवड समिती काय निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
साई सुदर्शन
साई सुदर्शन याला आयपीएलमध्ये केलेल्या कामिगरीमुळे इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली. साईने 18 व्या मोसमातील 15 सामन्यांमध्ये 156.17 च्या स्ट्राईक रेटने 759 धावा केल्या. साईने आयपीएलमध्ये आपली छाप सोडली. त्यामुळे निवड समिती साईच्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर संघात संधी देणार की नाही? हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.
जसप्रीत बुमराह
भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दुखापत होत आहे. त्यामुळे बुमराहला विश्रांती आणि वर्कलोडचा विचार करता आशिया कप स्पर्धेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहला मायदेशात विंडीज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संधी मिळू शकते.
