IND A vs UAE : 15 सिक्स-11 फोर, वैभव सूर्यवंशीचा झंझावात, भारताच्या 20 ओव्हरमध्ये विक्रमी 297 धावा
India A vs UAE Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि कॅप्टन जितेश शर्मा या जोडीने केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने टी 20 सामन्यात धावांचा डोंगर उभारला. भारताने 297 रन्स केल्या.

इंडिया ए टीमने जितेश शर्मा याच्या नेतृत्वात एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत धमाकेदार आणि वादळी सुरुवात केली आहे. भारताने स्पर्धेतील दुसऱ्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती संघाविरुद्ध रेकॉर्डब्रेक धावा केल्या आहेत. युवा वैभव सूर्यवंशी याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने यूएईसमोर भारताने 298 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 297 धावा केल्या.भारतासाठी वैभव सूर्यवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. तर कर्णधार जितेश शर्मा याने फिनीशिंग टच देत 83 धावा जोडल्या. आता भारत हा सामना किती धावांनी जिंकते? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
जितेश शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताची काही खास सुरुवात झाली नाही. भारताने 16 धावांवर प्रियांश आर्या याच्या रुपात पहिली विकेट गमावली. प्रियांशने 10 धावा केल्या. त्यानंतर वैभवची साथ देण्यासाठी नमन धीर मैदानात आला. वैभव आणि नमन या दोघांनी तोडफोड बॅटिंग केली. नमनने वैभवला जास्तीत जास्त खेळण्याची संधी दिली. वैभवने या संधीची पुरेपुर फायदा घेतला.
दुसर्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी
वैभवने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वैभवने पाहता पाहता अर्धशतक आणि शतकापर्यंत मजल मारली. त्यानंतरही वैभवची फटकेबाजी सुरुच होती. मात्र या दरम्यान नमन आऊट झाला आणि भारताने दुसरी विकेट गमावली. नमनने 34 धावा केल्या. वैभव-नमनने 57 बॉलमध्ये 163 रन्सची पार्टनरशीप केली.
जितेशकडून फिनीशिंग टच
त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशी आऊट झाला. वैभव आणि जितेशने 16 धावा जोडल्या. वैभवने 42 बॉलमध्ये 11 फोर आणि 15 सिक्ससह 144 रन्स केल्या. नेहल वढेरा याने 14 रन्स केल्या. तर जितेश शर्मा आणि रमनदीप सिंह या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 28 बॉलमध्ये नॉट आऊट 65 रन्सची पार्टनरशीप केली. रमनदीपने 6 धावा जोडल्या. तर जितेशने 32 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 8 फोरसह 83 रन्स केल्या.
यूएईच्या गोलंदाजांची धुलाई
यूएईकडून एकूण 7 खेळाडूंनी बॉलिंग केली. त्यापैकी फक्त तिघांनाच विकेट घेण्यात यश आलं. मुहम्मद फराजुद्दीन, अयान खान आणि मुहम्मद अरफान या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा भारतावर काही फरक पडला नाही. आता भारतीय गोलंदाज यूएई विरुद्ध किती ओव्हरमध्ये यूएईला ऑलआऊट करण्यात यशस्वी ठरतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
