AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, इंग्लंडचा 8 विकेट्सने धुव्वा, कांगारुंची मालिकेत एकतर्फी आघाडी
Australia vs England 2nd Test Match Result : स्टीव्हन स्मिथ याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने धमाका केला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली.

यजमान ऑस्ट्रेलियाने मायदेशात इंग्लंड विरूद्ध प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजमध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात दणदणीत आणि एकतर्फी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमधील द गाबा डे-नाईट पिंक बॉल टेस्टमध्ये चौथ्या दिवशीच (7 डिसेंबर) इंग्लंडवर मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मलिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये झालेला पहिला सामनाही 8 विकेट्सने जिंकला होता.
ऑस्ट्रेलियाचा सहज आणि सोपा विजय
इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 65 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 10 ओव्हरमध्ये 69 रन्स केल्या. मिचेल स्टार्क हा सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. स्टार्कने या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांनी पहिल्या डावात दुहेरी आकडा गाठला. ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी या सामन्यात आपलं योगदान दिलं.
सामन्यात काय झालं?
इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र मिचेल स्टार्क याच्या बॉलिंगसमोर जो रुट आणि झॅक क्रॉली या दोघांचा अपवाद वगळता इतरांना काही करता आलं नाही. झॅक क्रॉली याने अर्धशतक करत टीमला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. झॅकने 76 धावांची खेळी केली. तर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने पुन्हा एकदा शतक झळकावलं. रुटने 206 बॉलमध्ये 138 रन्स केल्या. रुटचं हे ऑस्ट्रेलियातील पहिलंवहिलं शतक ठरलं.
रुटने केलेल्या शतकी खेळीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 300 पार मजल मारती आली. इंग्लंडने 334 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 500 पेक्षा अधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 511 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र त्यांच्या प्रमुख फलंदाजांपैकी कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही.
ऑस्ट्रेलियासाठी जेक वेदराल्ड याने सर्वाधिक 72 धावा केल्या. स्टार्कने 71 धावांची अप्रतिम खेळी केली. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने 61 तर मार्नस लबुशेन याने 65 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
इंग्लंडचा दुसरा डाव
इंग्लंडसमोर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची 177 धावांची आघाडी मोडीत काढण्याचं आव्हान होतं. मात्र इंग्लंडला जेमतेम 240 पार पोहचता आलं. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचं 241 धावांवर पॅकअप केलं. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात बेन स्टोक्स याने 50 तर विल जॅक्स याने 41 धावा केल्या. तर जॅक क्रॉली याने 44 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 65 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड याने 22 आणि मार्नस लबुशेन याने 3 धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथ आणि जॅक वेदराल्ड या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. स्मिथने 23 आणि वेदराल्ड याने 17 रन्स केल्या.
