IND vs AUS : टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण कायम, आता ‘या’ खेळाडूला दुखापत

IND vs AUS : टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण कायम, आता 'या' खेळाडूला दुखापत

टीम इंडियाच्या चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. नवोदित गोलंदाज नवदीप सैनीला ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी करत असताना दुखापत झाली आहे.

अक्षय चोरगे

|

Jan 15, 2021 | 11:08 AM

ब्रिस्बेन : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील काळात दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (ब्रिस्बेन कसोटी) भारतीय संघात अर्ध्याहून अधिक खेळाडू नवखे आहेत. त्यातही प्रामुख्याने भारताचे पाचही गोलंदाज नवोदित आहे. या पाचपैकी एकाही गोलंदाजाने दोनपेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेले नाहीत. दरम्यान दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी चार नव्या खेळाडूंना आजच्या सामन्यात संधी देण्यात आली आहे. या सामन्यात भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भारताचा प्रमुख फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनदेखील नाही. तसेच सिडनी कसोटीचा हिरो हनुमा विहारी आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी नवोदित खेळाडूंना आजच्या सामन्यात संधी देण्यात आली आहे. त्यातच आता टीम इंडियाच्या चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. नवोदित गोलंदाज नवदीप सैनीला ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे 7.5 षटकं गोलंदाजी करुन त्याने मैदान सोडलं. (IND vs AUS : Navdeep Saini has groin Injury in Brisbane Test)

दरम्यान, सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विट केलं आहे की, “नवदीप सैनीच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत, सध्या त्याच्यावर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे देखरेख केली जात आहे.” सैनीने दुखापतीमुळे मैदान सोडले. त्याने आठव्या षटकातील पाच चेंडू टाकले होते, परंतु अखेरचा चेंडू तो टाकू शकला नाही. त्यामुळे त्याचं षटक पूर्ण करण्याची जबाबदारी कर्णधार अजिंक्य रहाणेने उपकर्णधार रोहित शर्मावर सोपवली. सैनीला आजच्या सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही. परंतु त्याने कसलेली गोलंदाजी केली आहे. त्याने 7.5 षटकांपैकी 2 षटकं निर्धाव टाकत केवळ 21 धावा दिल्या.

दरम्यान, ब्रिस्बेन कसोटीसाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. पोटाच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्याजागी टी. नटराजन याला संधी देण्यात आली आहे. नटराजन आज त्याच्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात करत आहे. पाठीच्या दुखापतीने हैराण असलेल्या रवीचंद्रन अश्विनलाही आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे.

सिडनी कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाले होते. या दोन्ही खेळाडूंना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. तसेच दोघेही इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. जाडेजाचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे, तर हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे आज रवींद्र जाडेजाऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे, तर हनुमा विहारीच्या जागी मयंक अग्रवालला संधी दिली आहे.

टीम इंडियाचा अनुभवहीन बॉलिंग अटॅक

शार्दुल फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 62 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 206 विकेट्स घेतल्या आहेत. 31 धावा देत 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ब्रिस्बेन कसोटीत शार्दुल एकटाच नवखा खेळाडू नाही. भारतीय संघातील सर्वच गोलंदाज नवखे आहेत. मोहम्मद सिराज, टी. नटराजन, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर हे पाच गोलंदाज भारतीय संघात आहेत. या पाचही जणांनी मिळून आतापर्यंत 13 कसोटी बळी मिळवले आहेत. तर सिराज, सैनी, नटराज आणि सुंदर हे चारही गोलंदाज त्यांच्या कारकीर्दीतली पहिलीच कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे नवख्या गोलंदाजांसह टीम इंडिया ब्रिस्बेन कसोटी कशी जिंकणार? असा सवाल भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात आहे.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ (India Playing XI) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी. नटराजन

दुखापतींचा दौरा

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. दुखापतींमुळे जलदगती गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी कसोटी मालिका खेळू शकले नाहीत. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने जलदगती गोलंदाज उमेश यादवदेखील मायदेशी परतला. त्यामुळे टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होती. त्याला नवोदित गोलंदाज मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या दोघांची साथ मिळाली. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने आता जसप्रीत बुमराहदेखील आजच्या सामन्यात खेळू शकला नाही.

जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये बुमराह जगातील सध्याच्या घडीचा सर्वश्रेष्ट गोलंदाज आहे. त्यामुळेच आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत नवख्या गोलंदाजांना सोबत घेऊन बुमराहने भारतीय जलदगती गोलंदाजीची धुरा चोखपणे सांभाळली. आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक डावात कांगारुंना जखडून ठेवले. परंतु आजच्या बुमराहदेखील नाही त्यामुळे भारतीय गोलंदाजी कमकुमवत ठरू शकते. सिराज, सैनी, नटराजन हे टी-20 मधील उत्तम गोलंदाज असले तरी त्यांना कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे शेवटचा कसोटी सामना जिंकणं भारतीय संघासाठी खूप कठीण असणार आहे.

हेही वाचा

नटराजनचं कसोटी पदार्पण, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

डेब्यू टेस्टमध्ये 10 चेंडू टाकले, दोन वर्षांपासून संघाबाहेर, कमबॅक सामन्यातील पहिल्याच चेंडूवर ‘तो’ हिरो ठरला

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें