AUS vs WI Test : पंचांच्या दोन चुकीच्या निर्णयामुळे सामन्याचं चित्र पालटलं, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर अन्याय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या साखळी सामन्यांना सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यांचा दोन दिवसांचा खेळ संपला असून निकाल लागणार हे स्पष्ट आहे. असं असताना पंचांचे दोन निर्णय वेस्ट इंडिजला महागात पडले.

ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. कारण पहिल्या दोन दिवसातच पहिला डाव संपला असून दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजला नाममात्र 10 धावांची आघाडी मिळाली आहे. खरं तर ही आघाडी अधिकची असू शकली असती. पण पंचांच्या दोन निर्णयांचा फटका वेस्ट इंडिजला बसल्याचं बोललं जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 180 धावा करत सर्व गडी गमावले. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने चांगली कामगिरी केली. 190 धावा करत 10 धावांची आघाडी घेतली. या आघाडीत भर पडली असती पण पंचांचे दोन निर्णय वादग्रस्त ठरले. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात शे होप आणि रोस्टन चेज यांची विकेट वादाचा विषय ठरला. पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे वेस्ट इंडिजला मोठा भुर्दंड भरावा लागला. काय झालं ते जाणून घेऊयात
पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेजने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली होती. त्याने 44 धावा केल्या होत्या. पण त्याला चुकीच्या पद्धतीने बाद होत तंबूत जावं लागलं. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर डिफेंड करताना चेंडू थोडा खाली राहिला आणि पॅडला लागला. त्यानंतर जोरदार अपील झाली आणि पायचीत असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर रोस्टनने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू पॅडवर लागण्यापूर्वी अल्ट्रा एज स्पाइक दिसले. पण तरीही पंचांनी त्याला बाद दिलं. पंचांच्या मते चेंडू आणि बॅट दरम्यान खूप गॅप होता. त्यामुळे अल्ट्रा एज स्पाईक का दिसले याबाबत शंका आहे.
Bat first or pad first? 🤔
Roston Chase given OUT… but UltraEdge had a spike.
Should that have been given out?#WIvsAUS pic.twitter.com/DaitLZhXPm
— FanCode (@FanCode) June 26, 2025
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात शे होप फलंदाजी करत होता. त्याने 90 चेंडूत 48 धावा केल्या होत्या. पण 91व्या चेंडूचा सामना करताना पंचांची चूक त्याला थेट तंबूत घेऊन गेली. ब्यू वेबस्टरच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि विकेटकीपर एलेक्स कॅरीने झेल पकडला. कॅरीने झेल पकडण्यासाठी उडी मारली होती. असं करताना चेंडूचा काही भाग जमिनीवर घासल्याचं कॅमेऱ्यात दिसत होतं. पण तरीही पंचांनी त्याला बाद असल्याचं घोषित केलं. त्यामुळे वादाला फोडणी मिळाली आहे.
Caught or did the ball touch the ground? 🫣
Windies are furious with that decision. What’s your call? ☝️ or ❌#WIvAUS pic.twitter.com/6evBQGk7vq
— FanCode (@FanCode) June 26, 2025
दरम्यान, दुसऱ्या डावात 4 गडी गमवून 92 धावा केल्या आहेत. यातून 10 धावा वजा करता ऑस्ट्रेलियाकडे 82 धावांची आघाडी आहे. दोन दिवसातच 24 विकेट पडल्या आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. ट्रेव्हिस हेड नाबाद 13, तर ब्यू वेबस्टर नाबाद 19 धावांवर खेळत आहेत.
