BAN vs PAK : बांगलादेशची हॅटट्रिक हुकली मात्र मालिका जिंकली, पाकिस्तानचा 2-1 ने धुव्वा
Bangladesh vs Pakistan 3rd T20I Match Result : पाकिस्तानने बांगलादेश दौऱ्याचा शेवट विजयाने केला आहे. पाकिस्तानने 74 धावांनी मात करत यजमान बांगलादेशला सलग तिसरा विजय मिळवण्यापासून रोखलं.

बांगलादेश क्रिकेट टीमने श्रीलंकेनंतर मायदेशातही धमाका कायम ठेवत सलग दुसरी टी 20I मालिका आपल्या नावावर केली आहे. बांगलादेशने पाकिस्तानचा सलग 2 सामन्यांमध्ये धुव्वा उडवत आधीच मालिका जिंकली होती. त्यामुळे बांगलादेशला आज 24 जुलैला सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी होती. मात्र अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने लाज राखली. पाकिस्तानने ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशवर 74 धावांनी मात केली. त्यामुळे पाकिस्तानच्या बांगलादेश दौऱ्याचा शेवट विजयाने झाला. तर बांगलादेशने ही मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली.
पाकिस्तानने बांगलादेशसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र विजयी धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने बांगलादेशला 16.4 ओव्हरमध्ये 104 रन्सवर गुंडाळलं.
पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दोघे आले तसेच झिरोवर आऊट झाले आणि मैदानाबाहेर परतले. बांगलादेशच्या फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्यापैकी दोघांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. मोहम्मद नईम आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी 10-10 धावा केल्या. तर मोहम्मद सैफुद्दीन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सैफदुद्दीन याने 34 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या. तर पाकिस्तानसाठी सलमान मिर्झा याने तिघांना बाद केलं. फहीम अश्रफ आणि मोहम्मद नवाझ या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अहमद, सलमान आघा आणि हुसैन तलाट या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
पाकिस्तानची बॅटिंग
त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 रन्स केल्या. पाकिस्तानसाठी ओपनर साहिबजादा फरहान याने सर्वाधिक 63 धावा केल्या. तर इतरांनी त्यांचं योगदान दिलं. बांगलादेशसाठी तास्किन अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नसुम अहमद याने दोघांना बाद केलं. तर शोरिफुल इस्लाम आणि सैफुद्दीन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
बीसीसीआयकडून बांगलादेश दौरा स्थगित
दरम्यान या मालिकेनंतर बांगलादेश मायदेशात टीम इंडिया विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार होती. मात्र बीसीसीआयने हा दौरा काही कारणामुळे स्थगित केला. त्यामुळे दोन्ही संघांच्या क्रिकेट चाहत्यांना व्हाईट बॉल सीरिजसाठी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.
