SMAT 2025: झारखंडने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर कर्णधार इशान किशनने सगळं काही सांगून टाकलं
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेच्या जेतेपदावर झारखंडने नाव कोरलं. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच झारखंडचे जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या विजयानंतर कर्णधार इशान किशन याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत झारखंडने हरियाणाला 69 धावांनी पराभूत केलं. झारखंडने या स्पर्धेचं जेतेपद पहिल्यांदाच मिळवलं आहे. कर्णधार इशान किशनच्या नेतृत्वात ही कामगिरी करण्यात यश आलं. खरं तर अंतिम फेरीत इशान किशनच्या वादळी खेळीमुळे हे शक्य झालं. इशान किशनने 49 चेंडूत 10 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली. तर कुशाग्रने 38 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार मारत 81 धावा केल्या. या दोघांच्या खेळी हरियाणाला महागात पडल्या. झारखंडने हरियाणासमोर विजयासाठी 262 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हरियाणाने 18.3 षटकात सर्व गडी गमवून 193 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं. या विजयाच शिल्पकार ठरला तो इशान किशन.. त्याच्या शतकी खेळीमुळे हरियाणाचा संघ बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं. जेतेपदानंतर कर्णधार इशान किशनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
इशान किशन म्हणाला की, ‘आम्ही विकेट गमावल्या तरी मोठे शॉट्स खेळत होतो, दुर्दैवाने आम्ही विराट सिंगला लवकर गमावले, पण आम्ही धावा काढण्याचा विचार करत होतो. अंतिम सामन्यात पाठलाग करणे कठीण असते. केकेने माझ्यासाठी हे सोपे केले, तो दुसऱ्या टोकाकडून मुक्तपणे आणि आत्मविश्वासाने धावा करत होता. हाच प्लस पॉइंट आहे. आम्ही सुरुवातीला गप्पा मारल्या, आम्ही फलंदाजांना त्यांचे शॉट्स खेळण्याची आणि सकारात्मक फलंदाजी करण्याची स्वातंत्र्य दिले. विशेषतः पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी ही खूप चांगली खेळपट्टी होती आणि त्यामुळे आम्हाला बोर्डवर इतका मोठा धावसंख्या उभारण्यास मदत झाली.’
इशान किशनने पुढे सांगितलं की, ‘सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून भरपूर पाठिंबा मिळाला, जर कोणताही फलंदाज चांगला खेळत नसेल तर ते त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिथे होते. आमच्यासाठी ही एक चांगली स्पर्धा होती. त्या सर्वांच्याच धाडसाची चाहूल लागली होती. विकासने लवकर विकेट्स घेतल्या, अनुकुलने 18 विकेट्स घेतल्या आणि सुशांत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते माझे ऐकत होते.’
दुसरीकडे हरियाणाचा कर्णधार अंकित कुमारने पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं. ‘आमची गोलंदाजी खराब होती. इशान किशन आणि केकेने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यांनी आम्हाला परत येण्याची संधी दिली नाही. अगदी अनुकूल आणि मिंझ यांनी ज्या पद्धतीने डाव संपवला. जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा आमच्या गोलंदाजांनी कामगिरी केली पण आजचा दिवस वेगळा होता. त्यांनी कमी धावसंख्येचाही बचाव केला. हा एक तरुण संघ आहे आणि आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो आहोत.’
