न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने विजयाचं श्रेय दिलं भारताच्या या खेळाडूंना, म्हणाला की…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला. खरं भारताने जिंकण्यासाठी फक्त 249 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही न्यूझीलंडला गाठता आलं नाही. न्यूझीलंडचा संघ 205 धावांवरच आटोपला. या विजयाचं श्रेय सँटनरने भारताच्या खेळाडूंना दिलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवट टीम इंडियाने विजयाने केला. आता भारताने उपांत्य फेरीत मोठ्या दिमाखात एन्ट्री केली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताचा सामना 4 मार्चला होणार आहे. खरं तर साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला होता. न्यूझीलंडने खेळपट्टीचा अंदाज घेऊन धावांचा पाठलाग करणं पसंत केलं होतं. पण सर्व फासे उलटे पडले. भारताला 50 षटकात 9 गडी गमवून 249 धावा करता आल्या. तसेच विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान न्यूझीलंड सहज गाठेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडचा डाव 205 धावांवर आटोपला. भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे अ गटात भारतीय संघ टॉपला राहिला आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 4 मार्चला होणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द जरी झाला तरी भारताचा फायदा आहे. भारताला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. दरम्यान, पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, ‘ आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो त्यापेक्षा संथ खेळपट्टी होती. सुरुवातीच्या टप्प्यावर भारताने चांगले नियंत्रण ठेवले. श्रेयसने एक उत्तम खेळी केली आणि हार्दिकने चांगल्या पद्धतीने शेवट केला. विचार करत होतो त्यापेक्षा सामना थोडा जास्त फिरला आणि त्यांनी चार दर्जेदार फिरकी गोलंदाजांसह आम्हाला चांगलेच अडचणीत आणले. आमच्यासाठी पॉवरप्लेमध्ये विकेट मिळवणे ही महत्त्वाची गोष्ट होती.’
‘आमचा पुढचा सामना लाहोरमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना त्या खेळपट्टीवर काही वेग आणि उसळी असलेल्या खेळपट्टी आहे. त्यांच्याकडे चार चांगले वेगवान गोलंदाज आहेत त्यामुळे आम्हाला त्यांचा कसा खेळ करायचा ते पहावे लागेल. आम्हाला वाट पहावी लागेल की तो वापरलेला पृष्ठभाग आहे की नवीन पृष्ठभाग आहे.’ असं मिचेल सँटनर म्हणाला.
