ENG vs IND : पाचव्या कसोटीचं दोघांना श्रेय, कर्णधार शुबमनने कुणाची नावं घेतली? पाहा व्हीडिओ
England vs India 5th Test : भारतीय खेळाडूंनी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने पाचवा आणि अंतिम सामना जिंकून कसोटी मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली.

टीम इंडियाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर रोमहर्षक असा विजय मिळवला. भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंगलंड या सामन्यात एका वेळेस फ्रँटफूटवर होती. हॅरी ब्रूक आणि जो रुट या जोडीच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडल एक वेळ 3 बाद 300 अशा भक्कम स्थितीत होती. मात्र तिथून भारतीय गोलंदाजांनी सामन्यात जोरदार कमबॅक केलं. भारताने त्यानंतर 67 धावांत इंग्लंडला 7 झटके दिले आणि विजय मिळवला. भारताचा हा या मालिकेतील दुसरा विजय ठरला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी केली आणि इंग्लंडला सीरिज जिंकण्यापासून रोखलं.
भारताची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली कसोटी मालिका होती. इंग्लंड विरूद्धच्या या मालिकेआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटीला अलविदा केला होता. त्यामुळे टीम इंडियाचं या मालिकेत या दोघांशिवाय कसं होईल, अशी चिंता क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र या मालिकेत प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. भारताने पाचव्या सामन्यात उपकर्णधार ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांशिवाय हा विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडिया कोणत्याही खेळाडूवर विसंबून नाही, हे या विजयातून स्पष्ट झालं.
पाचव्या सामन्यात भारताला विजयी करण्यात बहुतांश खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. सिराजने दोन्ही डावात एकूण 9 विकेट्स घेतल्या. तर प्रसिधने दोन्ही डावात प्रत्येकी 4-4 अशा एकूण 8 विकेट्स मिळवल्या. या दोघांनी मिळून इंग्लंडच्या 17 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार शुबमन गिल याने सिराज आणि प्रसिध या दोघांचा विशेष उल्लेख केला.
गिल काय म्हणाला?
“मोहम्मद सिराज कोणत्याही कर्णधारासाठी स्वप्न आहे. सिराजने प्रत्येक बॉल, ओव्हर आणि स्पेलमध्ये जीव ओतला. सिराज आमच्यासोबत टीममध्ये आहे हे आमच भाग्य आहे”, असं गिलने म्हटलं. तसेच शुबमनने वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याचंही कौतुक केलं. प्रसिधने या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या. मात्र तो सिराजच्या तुलनेत किंचीत महागडा ठरला.
प्रसिध-शुबमनचं कौतुक
“He’s a captain’s dream” 💭
Shubman Gill discusses the importance of Mohammed Siraj for India 🇮🇳 pic.twitter.com/iwXiK49iqr
— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 4, 2025
जेव्हा सिराज आणि प्रसिधसारखे गोलंदाज असतात तेव्हा नेतृत्व सोपं वाटतं. आमची आजची कामगिरी ही शानदार होती. आम्हाला पूर्ण विश्वास होता. इंग्लंड दबावात आहे, हे आम्हाला माहित होतं. आम्हाला हेच निश्चित करायचं होतं की ते कायम दबावात रहावेत. दबावात जे व्हायला नको तसंच होतं, हे सर्वांना माहितीय”, असंही गिलने म्हटलं.
