वनडे वर्ल्डकप 2025 बाबत मोठी अपडेट, चार सामने होणार की नाही? जाणून घ्या काय झालं
आयसीसी वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी चार सामने अडचणीत आले आहेत. त्यामुळे आयसीसीची धावाधाव सुरु झाली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून होणार असून अंतिम सामना 2 नोव्हेबरला होणार आहे. ही स्पर्धा जवळपास एक महिना असणार आहे. या स्पर्धेचं आयोजन एम चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळुरू), एसीए स्टेडियम (गुवाहाटी), होळकर स्टेडियम (इंदूर), एसीए-व्हीडीसीए स्टेडियम (विशाखापट्टणम) आणि आर प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो) येथे होतील. उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने पकडून एकूण 31 सामने होणार आहे. यापैकी चार सामने हे बंगळुरुत होणार आहे. हे सामने आता इतरत्र हलवण्याची वेळ आली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला (केएससीए) स्टेडियममध्ये हे सामने आयोजित करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून अद्याप आवश्यक मान्यता मिळालेली नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटन सामना आणि उपांत्य फेरीचा सामना जो बेंगळुरूमध्ये होणार होता तो इतरत्र आयोजित केला जाऊ शकतो.
केएससीएने महाराजा टी20 स्पर्धा बंगळुरूहून म्हैसूरला हलवली आहे. त्यामुळे महिला वनडे वर्ल्डकप सामन्यांबद्दलही सस्पेन्स आहे. “आम्ही राज्य सरकारला पत्र लिहिले आहे आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्यांनी परवानगी नाकारली आहे असे नाही. जर धोरण असे असते तर त्यांनी म्हैसूरमध्ये महाराजा कपला परवानगी दिली नसती. म्हणून आम्ही वाट पाहत आहोत,” असे केएससीएच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझशी बोलताना सांगितले.
जूनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 18 वर्षांनी जेतेपद मिळाल्याने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जल्लोष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या आयोजनचा खेळखंडोबा झाला. स्टेडियमबाहेर अभूतपूर्व गर्दी जमा झाली आणि चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50हून अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने चिन्नास्वामी स्टेडियमला मोठ्या स्पर्धांसाठी असुरक्षित घोषित केले.
महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धा 12 वर्षांनी भारतात होणार आहे. पण पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होतील. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेच्या कोलंबो येथील प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे.
