IND vs AUS : टीम इंडियाची युवा बिग्रेडही जोरात, सलग दुसरा विजय, कांगारुंचा 2-0 ने धुव्वा
India U19 vs Australia U19 2nd Youth Test Match Result : अंडर 19 टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात वनडेनंतर मल्टी डे सीरिजमध्येही ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत सलग पाचवा विजय साकारला आहे.

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी पंच लगावला आहे. टीम इंडियाने आधी 3 मॅचची वनडे यूथ सीरिज 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या मल्टी डे मॅचमध्ये पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 81 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने यासह 7 विकेट्सने हा सामना जिंकला. भारताने या सलग दुसऱ्या विजयासह ऑस्ट्रेलियाला 2-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं आहे.
भारताला ही मालिका जिंकून देण्यात स्टार वैभव सूर्यवंशी याने निर्णायक भूमिका बजावली. वैभवने या मालिकेत 133 धावा केल्या. वैभवने आपल्या पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपली छाप सोडली आणि पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं.
वैभव सूर्यवंशीची कामगिरी
वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या 2 सामन्यांच्या मालिकेत 9 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने एकूण 133 धावा केल्या. वैभवने 3 डावात या धावा केल्या. वैभवने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 86 चेंडूत झंझावाती 113 धावांची खेळी केली. वैभवने या शतकी खेळीत 8 षटकार आणि 9 चौकार लगावले. वैभवची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर वैभवने दुसऱ्या सामन्यात 1 सिक्स आणि 2 फोरसह एकूण 20 धावा केल्या. वैभवने अशाप्रकारे 2 सामन्यांमध्ये 9 षटकारांसह 133 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा 2-0 ने धुव्वा
टीम इंडियाने पहिला सामना हा डाव आणि 58 धावांनी जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा होता. मात्र दुसऱ्या सामन्यताही टीम इंडियाने कांगारुंना लोळवलं. भारताने अशाप्रकारे सामना जिंकला. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला.
दुसऱ्या सामन्यात काय झालं?
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 135 रन्सवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने प्रत्युत्तरात 171 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 36 धावांची आघाडी घेतली. कांगारुंना दुसऱ्या डावातही काही खास करता आलं नाही. भारतासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव हा 116 रन्सवर आटोपला. त्यानंतर भारताने 81 धावांचं आव्हान पूर्ण केलं आणि 7 विकेट्सने सामना जिंकला.
यूथ वनडे सीरिजमध्ये विजयी हॅटट्रिक
त्याआधी उभयसंघात 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 मॅचची यूथ वनडे सीरिज खेळवण्यात आली होती. भारताने ही 3 सामन्यांची मालिका एकतर्फी फरकाने जिंकली. भारताने सलामीच्या सामन्यात 7 विकेट्सने जिंकला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 51 धावांनी मात केली. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 167 धावांच्या ऐतिहासिक फरकाने विजय साकारला.
