IND vs ENG: कसोटी इतिहासातील सर्वात वाईट गोलंदाजी; प्रसिद्ध कृष्णाने रचला नकोसा विक्रम
एजबेस्टन कसोटीत भारताने धावांचा डोंगर रचूनही इंग्लंडने फॉलोऑनचं संकट टाळलं. यासाठी भारताची सुमार गोलंदाजी कारण ठरली. प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात सर्वात महागडा स्पेल टाकला. त्यामुळे भारतावर सलग दुसरा कसोटी सामना गमवण्याचं संकट घोंघावत आहे.

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यातही नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. पण या संधीचं सोनं भारतीय फलंदाजांनी केलं. खासकरून शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली आणि 269 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने सर्व गडी गमवून 587 धावांपर्यंत मजल मारली. पण इतक्या धावा करूनही गोलंदाजांना इंग्लंडवरील दबाव कायम ठेवता आला नाही. सुरुवातीला 5 गडी गमावल्यानंतर भारत फॉलोऑन देईल असं वाटत होतं. पण त्याच्या उलट झालं. सहाव्या विकेटसाठी हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी 300 हून अधिक धावांची भागीदारी केली. यामुळे आता भारताला सामना गमवण्याची भीती सतावू लागली आहे. या सामन्यातही भारताच्या सुमार गोलंदाजीचं दर्शन घडलं. यात प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या सामन्यासारखाच महागडा स्पेल टाकला. इतकंच काय तर नकोसा विक्रमही नावावर केला.
आयपीएल 2025 स्पर्धेत प्रसिद्ध कृष्णाने आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवली होती. सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप मिळवली होती. त्याच जोरावर त्याला संघात स्थान मिळालं पण इंग्लंड दौरा त्याच्यासाठी एक दुःस्वप्न आहे. आयपीएलमध्ये जास्त धावा न देता विकेट घेऊन नाव कमावणाऱ्या कृष्णाने इंग्लंड दौऱ्यात खोऱ्याने धावा दिल्या आहेत. त्यामुळे त्याच्या खात्यातील सर्वात वाईट विक्रमांपैकी एक ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रमांपैकी एका विक्रमाच्या वेशीवर आहे.
प्रसिद्ध कृष्णाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट इकॉनॉमी रेट असलेला गोलंदाज असल्याचा नकोसा विक्रम रचला आहे. कसोटीत किमान 500 चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचं तर प्रसिद्ध कृष्ण हा त्यांच्यापैकी सर्वात महागडा गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये प्रति षटक पाच पेक्षा जास्त धावा देण्याच्या इकॉनॉमी रेटसाठी त्याचं नाव नोंदवलं गेलं आहे. इतकंच काय तर एका षटकात 23 धावा दिल्या होत्या. प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या डावात 13 षटकात टाकली आणि एकही विकेट न घेता 72 धावा दिल्या.
कसोटीत बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शहादत हुसेनच्या नावावर सर्वात वाईट इकॉनॉमी रेट आहे. त्याने 5380 चेंडूत 4.16 च्या इकॉनॉमी रेटने 3731 धावा दिल्या आहेत. तर आरपी सिंगने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वाईट इकॉनॉमी रेटचा विक्रम केला आहे. त्याने 2534 चेंडूंमध्ये 3.98 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.
