IND vs PAK : ठाकरे गटाने हिसका दाखवताच PVR प्रशासन वठणीवर, भारत-पाक सामन्याच्या स्क्रीनिंगबाबत निर्णय काय?
India vs Pakistan Pvr Screening : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असताना असंवेदनशीलपणा दाखवत पीव्हीआरने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा निर्णय घेतला होता.

आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात रविवारी 28 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना दुबईत आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांची अंतिम सामन्यानिमित्ताने आमनेसामने येण्याची ही महिन्याभरातली तिसरी वेळ आहे. याआधी टीम इंडियाने पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीत पराभूत केलं आहे. त्यानंतर आता टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करत आशिया चॅम्पियन होण्यासाठी उत्सूक आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला विरोध कायम आहे. मात्र सामना होणार हे सांगण्याची वेगळी गरज नाही. मात्र देशवासियांच्या भावना तीव्र आहेत. त्यात पीव्हीआरने घेतलेल्या एका निर्णयामुळे संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या दणक्यानंतर पीव्हीआरने सामन्याच्या काही तासांआधी आपला निर्णय बदलला आहे.
पीव्हीआरने टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्याचं स्क्रिनिंग करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पीव्हीआरकडून एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावरुन संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या संचारसेनेकडून या निर्णयाबाबत पीव्हीआरला जाब विचारण्यात आला. पीव्हीआरची याबाबत कानऊघडणी करण्यात आली. त्यानंतर पीव्हीआरने भारत-पाक सामन्याचं स्क्रीनिंग करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. याबाबतची माहिती शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी दिली.
पीव्हीआरची एक्स पोस्ट
Cricket’s fiercest rivalry deserves cinema’s grandest screen. 🏆 Watch Asia Cup 2025 Final – India vs Pakistan, LIVE only at PVR INOX. 🎬💥
📅 28th September | 🕗 8 PM Book now: https://t.co/WyiWtS04Me . . .#AsiaCup2025 #INDvsPAK #PVRINOX #CricketOnTheBigScreen #AsiaCup… pic.twitter.com/WvP7OMYOfc
— P V R C i n e m a s (@_PVRCinemas) September 27, 2025
शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे आणि कार्यकर्त्यांनी दुपारी थोड्याच वेळापूर्वी पीव्हीआर आयनॉक्स या ठिकाणी जाऊन प्रशासनासह त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळेस अखिल चित्रे यांनी काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
शिव संचार सेनेचे अध्यक्ष काय म्हणआाले?
“सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारत पाकिस्तान सामन्याला इथे विरोध होतोय. अशात महाराष्ट्रात मॅच का दाखवता आहेत? हा आमचा मूळ प्रश्न आहे” असं चित्रे यांनी म्हटलं.
“आम्ही अशाच पद्धतीने गेल्या वेळी सुद्धा इंटरटेनमेंट कंपनीला जाब विचारला होता. त्यांनी आमचं काय ऐकलं नाही. आता पीव्हीआर सुद्धा ती चूक करत आहे. त्यामुळे याचे परिणाम भोगावे लागतील”, असा इशारा चित्रे यांनी दिला.
“तसेच शिवसैनिक जेव्हा पेटून उठतात तेव्हा ते काय करतात हे आज आम्ही दाखवणार आहोत”, असंही चित्रे म्हणाले. दरम्यान पीव्हीआर प्रशासनाकडून ठाकरे गटाच्या या इशाऱ्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम लागला आहे.
