IND vs SA : टीम इंडिया 9 विकेट्सवरच ऑलआऊट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 189 रन्सवर पॅकअप, फक्त 30 धावांची आघाडी
India vs South Africa 1st Test : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीतील पहिला दिवस गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला झटपट गुंडाळलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी कमबॅक केलं आणि भारताला मोठी आघाडी घेण्यापासून यशस्वीरित्या रोखलं.

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवशी 159 धावांवर गुंडाळलं होतं. त्यानंतर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 37 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला आघाडी घेण्यासाठी आणखी 122 धावांची गरज होती. भारताने दुसऱ्या दिवशी आघाडी घेतली. मात्र ती आघाडी नाममात्र ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताला दुसऱ्या दिवशी 9 विकेट्सच्या मोबदल्यात 152 धावाच करता आल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या 159 च्या प्रत्युत्तरात 189 धावा केल्या. भारताला यासह फक्त 30 धावांचीच आघाडी घेता आली. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियाकडून या सामन्यात एकालाही 40 पार मजल मारता आली नाही. भारतासाठी ओपनर केएल राहुल याने सर्वाधिक 39 धावा केल्या. तसेच अपवाद वगळता इतर सर्वांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र फलंदाजांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी सायमन हार्मर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मार्को यान्सेन याने भारताच्या 3 फलंदाजांना बाद करत मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल या जोडीने 1 आऊट 37 रन्सपासून दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 57 रन्सची पार्टनरशीप केली. सुंदरने 29 रन्स केल्या. त्यानंतर कॅप्टन शुबमन गिल 3 बॉलमध्ये 4 धावा करुन रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. शुबमनला मानेला त्रास जाणवला. त्यामुळे शुबमन पुन्हा बॅटिंगसाठी आला नाही.
दुसऱ्या बाजूला केएल राहुल संयमीपणे खेळ करत होता. मात्र केशव महाराजने केएलला आऊट केलं. केएलने 39 धावांचं योगदान दिलं. उपकर्णधार ऋषभ पतं याने फटकेबाजी केली. मात्र पंत फार वेळ मैदानात टिकू शकला नाही. कॉर्बिन बॉश याने पंतला 27 रन्सवर आऊट केलं.
टीम इंडियाचं 189 रन्सवर पॅकअप
Innings Break!#TeamIndia have secured a lead of 3⃣0⃣ runs in the first innings 👍
Over to our bowlers in the second innings!
Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pyAO3XPGfA
— BCCI (@BCCI) November 15, 2025
लोअर ऑर्डरची घसरगुंडी
ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल या दोघांकडून भारताला आशा होत्या. दोघांना सुरुवातही मिळाली. मात्र या दोघांनीही दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले. ध्रुवने 14 आणि जडेजाने 27 धावांचं योगदान दिलं. कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 धाव केली. अक्षर पटेल याने भारतासाठी अखेरच्या क्षणी काही धावा जोडल्या, ज्यामुळे भारताला आघाडी घेता आली. अक्षरने 16 रन्स केल्या. भारताने अक्षरच्या रुपात नववी विकेट गमावली. तर शुबमन बॅटिंगसाठी पुन्हा येऊ न शकल्याने भारताचा डाव हा 62.2 ओव्हरमध्ये 9 आऊट 189 रन्सवर आटोपला.
