IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाला 8 दिवसांचा ब्रेक, कधी सुरु होईल जाणून घ्या
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. आता चौथ्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेत आतापर्यंत इंग्लंडने 2-1 आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना इंग्लंडने 5 गडी राखून, दुसरा सामना भारताने 336 धावांनी, तर तिसरा सामना इंग्लंडने अवघ्या 22 धावांनी जिंकला. आता मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला चौथा सामना काहीही करून जिंकावा लागेल. तसं झालं नाही तर किमान हा सामना ड्रॉ करून पाचव्या सामन्यात विजयाची अपेक्षा करावी लागेल. कारण हा सामना गमावला तर भारताच्या हातून मालिका जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरू होईल. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान आठ दिवसांचे अंतर आहे. या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन्ही संघ 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर मैदानावर उतरतील.
भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी साडे तीन वाजता सुरु होईल. तीन वाजचा नाणेफेकीचा कौल होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना थेट पाहता येईल. तुम्ही थेट सामना मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकता. या कसोटीचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवर केले जाईल. पहिले सत्र दोन तासांचे असेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता लंच ब्रेक होईल. 40 मिनिटांच्या ब्रेकनंतर संध्याकाळी 6.10 मिनिटांना सामना सुरु होईल. दुसरे सत्र देखील दोन तासांचे असेल. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी टी ब्रेक होईल. हा ब्रेक 20 मिनिटांचा असेल. त्यानंतर रात्री 8.30 ते 10 वाजेपर्यंत हा खेळ चालेल.
टीम इंडिया कसोटी सामन्यात बदल करण्याची शक्यता आहे. कारण मागच्या तीन सामन्यात करूण नायरची खेळी काही खास राहिली नाही. त्याला वारंवार संधी देऊनही तो आपला फॉर्म काही दाखवू शकला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या ऐवजी संघात साई सुदर्शनला संधी मिळू शकते. तर जसप्रीत बुमराहला आराम दिला जाऊ शकतो. तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते.
