RR vs LSG : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा डेब्यू सामन्याच्या पहिल्या चेंडूवर कहर, गोलंदाजांना फुटला घाम
आयपीएल 2025 स्पर्धेत एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. राजस्थान रॉयल्सकडून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला आणि रेकॉर्ड नोंदवला. सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर पहिल्याच चेंडूवर आपल्या आक्रमक शैलीचं दर्शन घडवलं.

आयपीएल स्पर्धा म्हंटलं की रेकॉर्ड मोडणं आणि रचणं आलंच..प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम रचले जात आहेत. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात एक वेगळाच विक्रम रचला गेला. सर्वात कमी वयाच्या म्हणजेच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं. 14 वर्षे आणि 23 दिवसांचा असताना वैभव सूर्यवंशी आयपीएस स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून पहिला सामना खेळला. यापूर्वी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रयास रे बर्मनच्या नावावर होता. त्याने 2019 आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात खेळला होता. त्याचा विक्रम आता वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर केला आहे. इतकंच काय तर वैभव सूर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात आणखी एक विक्रम रचला. पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून विक्रमाची नोंद केली आहे. नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा वैभव सूर्यवंशी प्लेइंग 11 चा भाग नव्हता. लखनौने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. 20 षटकात 180 धावा केल्या आणि विजयासाठी 181 धावांच आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला.
लखनौ सुपर जायंट्सकडून पहिलं षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकुर आला होता. यशस्वी स्ट्राईकला होता आणि पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन वैभवला स्ट्राईक दिला. शार्दुल ठाकुरचा चौथा आणि वैभव आयपीएल फेस करणारा पहिला चेंडू होता. मग काय वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूवर आपण काय आहोत याची प्रचिती दिली. उत्तुंग षटकार मारला. त्यामुळे आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयाचा खेळाडू आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. आयपीएल स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा नववा खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशी 20 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकार मारून 34 धावा करून बाद झाला. त्याने 170 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
Halla Bol from Ball One! 🔥💗 pic.twitter.com/iH5r2yR1x9
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 19, 2025
रॉब क्विने (राजस्थान रॉयल्स), केवॉन कूपर (राजस्थान रॉयल्स), आंद्रे रसेल (केकेआर), कार्लोस ब्रॅथवेट (दिल्ली डेअरडेव्हिल्स), अनिकेत चौधरी (आरसीबी), जेवॉन सीर्लेस (केकेआर), सिद्देश लाड (मुंबई इंडियन्स), महेश थीक्षाणा (सीएसके), समीर रिझवी (सीएसके) या खेळाडूंनी पदार्पणात पहिल्या चेंडूवर षटकार मारला आहे. आता वैभव सूर्यवंशी नववा खेळाडू ठरला.
