लखनौ सुपर जायंट्ससोबत येताच झहीर खानचा सूर बदलला, रोहित शर्माच्या ‘त्या’ निर्णयाबाबत सांगितलं असं काही
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी झहीर खान लखनौ सुपर जायंट्सच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आला आहे. गौतम गभीरनंतर ही धुरा आता झहीर खान सांभाळणार आहे. असं असताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीने ज्या गोष्टीला विरोध दर्शवला होता, त्या गोष्टीचं आता झहीर खानने समर्थन केलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेचं बिगुल खऱ्या अर्थाने वाजलं आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तीन वर्षानंतर मेगा लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे खेळाडूंची मोठी उलथापालथ होणार यात शंका नाही. तत्पूर्वी फ्रेंचायझींनी संघ बांधणीसाठी पावलं उचलली आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघात गेल्या काही दिवसात बऱ्याच घडामोडी घडत आहे. दोन दिवसांपूर्वी कर्णधार केएल राहुलने फ्रेंचायझी मालक संजीव गोयंका यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी संघाने झहीर खान याची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे. असं सर्व होत असताना लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर झहीर खानने आयपीएलच्या नियमाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. हा नियम दुसरा तिसरा काही नसून इम्पॅक्ट प्लेयर आहे. खरं तर या नियमाला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विरोध केला आहे. पण आता झहीर खानच्या वक्तव्यामुळे या वादाला नवी फोडणी मिळू शकते. कारण या नियमाबाबत लखनौचा मेंटॉर होताच झहीर खानने वेगळं मत जाहीर केलं आहे.
झहीर खानच्या मते, इम्पॅक्ट नियमामुळे युवा खेळाडूंना संधी मिळेल. खासकरून मेगा ऑक्शनमध्ये याचा प्रभाव दिसून येईल. जेव्हा फ्रेंचायझीची नजर अशा प्रकारच्या खेळाडूंवर असेल. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळाली तर भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये आणखी सुधारणा होईल. ‘मी पाहिलं आहे की, इम्पॅक्ट प्लेयर नियम चर्चेचा विषय ठरला आहे. मी सर्वांसमोर सांगू इच्छितो की मी या नियमाचं समर्थन करतो. या नियमामुळे अनकॅप्ड प्लेयर्संना खेळण्याची संधी मिळाली आहे. अशाच अष्टपैलू खेळाडूंसाठी जाग शिल्लक राहात नाही. जर चेंडू आणि बॅटने चांगलं करू शकत असाल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.’, असं झहीर खानने सांगितलं.
View this post on Instagram
आयपीएलमध्ये 2023 मध्ये पहिल्यांदा इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू झाला होता. त्यानंतर एकाच पर्वानंतर हा नियम वादाच्या भोवऱ्यात अडकला. काही जण या नियमाच्या समर्थनार्थ होते. तर काही जणांनी याला विरोध केला आहे. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं नुकसान होईल असं सांगण्यात येत आहे. रोहित शर्माने सांगितलं होतं की, हा नियम अष्टपैलू खेळाडूंना मागे टाकणारा आहे. क्रिकेट 12 नाही तर 11 खेळाडूंनी खेळला जातो. चाहत्यांना थरारक सामन्याची अनुभूती देण्यासाठी खेळातून बरंच घेतलं जात आहे.
