मुस्तिफिझुर रहमानला अखेर केकेआरने काढलं, त्याच्याऐवजी या खेळाडूंचं नशिब चमकणार!
Mustafizur Rahman: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तिफिझुर रहमान याला कोलकाता नाइट रायडर्स संघात स्थान दिल्याने गेल्या काही दिवसांपासून वाद रंगला होता. अखेर त्याला संघातून रिलीज केलं आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर हा निर्णय घेतला गेला आहे.

Mustafizur Rahman released: आयपीएल 2026 स्पर्धेला दोन महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असं असताना कोलकाता नाइट रायडर्स संघात एक मोठी उलथापालथ झाली आहे. मिनी लिलावात डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तिफिझुर रहमान याच्यासाठी केकेआरने 9.2 कोटींची बोली लावली होती. केकेआरने इतकी मोठी बोली लावून त्याला संघात घेतलं होतं. पण त्याला संघात घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून वादाला फोडणी मिळाली होती. बीसीसीआयसह केकेआरवर टीकेची झोड उठली होती. आता बीसीसीआयने केकेआरला मुस्तिफिझुर रहमानला संघाबाहेर करण्याचे आदेश दिले. यानंतर केकेआरने त्याला संघातून बाहेर काढलं आहे. इतकंच काय तर केकेआरने माहिती देताना सांगितलं की, बीसीसीआयने त्याच्या बदल्यात दुसरा खेळाडू निवडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार याची उत्सुकता आहे.
मुस्तिफिझुर रहमानला संघाबाहेर केल्यानंतर केकेआरकडे आता त्याची जागा भरून काढण्याचं आव्हान आहे. एका खेळाडूचं नशिब यामुळे पालटणार हे मात्र नक्की आहे. काही खेळाडूंना आयपीएल मिनी लिलावात भाव मिळाला नव्हता. आता त्यापैकी एकाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. केकेआरकडे त्याची जागा भरून काढण्यासाठी चार पर्याय आहेत. त्यापैकी एकाची निवड संघात केली जाऊ शकते. ही जागा वेगवान गोलंदाजच भरून काढेल यात काही शंका नाही. फॉर्म आणि संघाला फायदा होणाऱ्या खेळाडूची केकेआर निवड करेल, यात काही दुमत नाही.
KKR Media Advisory. 🔽 pic.twitter.com/ZUZB620Uv7
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 3, 2026
- फझलहक फारुकी : अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तिफिझुर रहमानची जागा घेऊ शकतो. त्याचा टी20मधील रेकॉर्ड चांगला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. त्याने 51 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 63 विकेट घेतल्या आहेत.
- जोशुआ लिटिल : आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिल हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय 74 सामन्यात 82 विकेट घेतल्या आहेत. तसेच एसए20, आयएलटी20, सीपीएलसारख्या लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या गोलंदाजीची शैली मुस्तफिझुर रहमानसारखीच आहे.
- स्पेन्सर जॉन्सन : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज स्पेन्सर जॉनसन आयपीएल 2026 स्पर्धेसाठी चांगला पर्याय ठरू शकते. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळला आहे. त्यामुळे त्याच्याकडे चांगला अनुभव आहे.
- रिचर्ड ग्लीसन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनवरही केकेआरच्या नजरा असतील. त्याने एसए20मध्ये चांगली कामगिरी केली होती. या लीगच्या 3 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहे. इतकंच काय तर त्याचा गोलंदाजीचा माराही अचूक आहे. त्यामुळे हा पर्याय देखील केकेआरकडे असेल.
