Video : बाबर आझमची एक चूक नडली! आधी शून्यावर बाद झाला, आता 52 धावांची बसली ‘पेनल्टी’
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हा सामना रंगतदार वळणावर आला आहे. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असं सुरुवातीला वाटत होतं. पण चौथ्या दिवशी सर्व चित्र बदलून गेलं. पहिल्या डावात बांगलादेशने 117 धावांची आघाडी घेतली. यात बाबर आझमची एक चूक नडली.

बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले आहेत. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने पहिल्या कसोटीत 117 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्याची वाटचाल ड्रॉकडे सुरु झाली आहे. जर काही उलटसूलट झालं तर हा सामना बांगलादेश जिंकू शकतो अशी स्थिती आहे. पण पाचव्या दिवशी बांगलादेशच्या पराभवाची शक्यता जवळपास नाहीच. बांगलादेशकडून पहिल्या डावात शदमन इस्लामने 93 धावा, मोमिनुलने 50 धावा, मुशफिकुर रहिमने 191 धावा, लिटन दासने 56 धावा, तर मेहदी हसन मिराजने 77 धावांची खेळी केली. पहिल्या डावात पाकिस्तानला काही चुका नडल्या. यात बाबर आझमची एक चूक चांगलीच महागात पडली. पहिल्या डावात फलंदाजी करताना बाबर आझम शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे आधीच क्रीडाप्रेमींच्या रडावर आला होता. आता त्याच्या एका चुकीचा फटका पाकिस्तानला 52 धावांसाठी बसला आहे.
पाकिस्तानने दिलेल्या 448 धावांचा पाठलाग करताना सामन्याच्या चौथ्या दिवशी मुशफिकुर रहिमने जबरदस्त भूमिका बजावली. बांगलादेशचा माजी कर्णधार असलेल्या मुशफिकुरने चौथ्या दिवशी 54 धावांच्या पुढे खेळताना शतक ठोकलं. त्यामुळे त्याची विकेट पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाची होती. अशी संधीही चालून आली होती. पण बाबर आझमने पाकिस्तानच्या फिल्डिंगचा कित्ता गिरवला. मुशफिकुरला बाद करण्यासाठी लेग स्लिपला बाबर आझमला उभं केलं होतं. पार्ट टाईम बॉलरची गोलंदाजी पाहता त्याला तिथे उभं केलं होतं. हातात झेल येईल असं गृहीत धरूनच फिल्डिंग लावली होती. झालंही तसंच पण बाबर आझमला सोपा झेल पकडता आला नाही.
Babar Azam dropped the catch of Mushfiqur Rahim.#PAKvBAN pic.twitter.com/VzhaEtm2yH
— 𝙎𝙝𝙚𝙧𝙞 (@CallMeSheri1) August 24, 2024
मुशफिकुर त्यावेळेस 149 धावांवर खेळत होता. जीवदान मिळाल्यानंतर त्याने त्यात आणखी 52 धावा जोडल्या आणि 191 धावा केल्या. जर बाबर आझम ही विकेट घेण्यास यशस्वी ठरला असता तर बांगलादेशचा संघ झटपट बाद झाला असता. बांगलादेशला कदाचित 117 धावांची आघाडी घेता आली नसती. दुसरीकडे, मोहम्मद रिझवान सुद्धा चूक करून बसला. मिराजच्या 50 धावा झाल्या होत्या. तेव्हा त्याचा सोपा झेल हातात आला होता. पण रिझवानने सोडल्याने त्याला आणखी 27 धावा करता आल्या. त्यामुळे दोन झेल सुटल्याचा फटका पाकिस्तानला बसला.
