Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाची धाकधूक वाढली! कारण काय?
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईत होणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटात धाकधूक वाढली आहे. सामन्यापूर्वी असं घाबरण्याचं कारण काय?

आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी वादाला फोडणी मिळाली आहे. हा सामना खेळू नये यासाठी सोशल मीडियावर रान पेटलं आहे. दुसरीकडे, विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. असं असताना भारतीय खेळाडू या सामन्यापूर्वी थोडे घाबरल्याची चर्चा आहे. भारतीय संघात 7 खेळाडू असे आहेत की त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कधीही टी20 सामना खेळलेला नाही. यात तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकु शर्मा, जितेश शर्मा, अभिषेक शर्मा, हार्षित राणा आणि कुलदीप यादवचा समावेश आहे. यापैकी पाच खेळाडूंचं पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग 11 मधील निवड पक्की आहे. रिपोर्टनुसार, या सामन्याबाबत जे काही वातावरण तयार झालं आहे त्यामुळे खेळाडू या सामन्याबाबत निराश झाले आहेत. भारत पाकिस्तान सामन्यावर अनेक लोकांनी सोशल मीडियावर बॉयकॉट टाकला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंची चिंता वाढली आहे. इतकंच काय खेळाडूंनी हाच मुद्दा ड्रेसिंग रूममध्ये उचलला होता. यावर दीर्घ काळ चर्चा देखील झाली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारत पाकिस्तान सामन्यात बॉयकॉट टाकण्याचा मुद्दा गौतम गंभीरच्या समोर आला. खेळाडूंनी गंभीर आणि इतर सहकारी स्टाफसोबत चर्चा केली.
भारतीय संघाच्या खेळाडूंनी हा मुद्दा मांडल्यानंतर बैठकीत दीर्घ काळ चर्चा झाली. तसेच या मीटिंगमधून खेळाडूंना प्रोफेशनल पद्धतीने वागण्याचा सल्ला देण्यात आला. हा सामना त्यांच्यासाठी इतर सामन्याप्रमाणे व्हायला हवा. दबाव इतका आहे की, पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी होणाऱ्या पत्रकार परिषदेत कोणताही खेळाडू आला नाही. पत्रकार परिषदेला सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट सामोरे गेले. तसेच त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये काय चर्चा झाली याबाबत सांगितलं.
पत्रकार परिषदेत रयान टेन डोशेट स्पष्ट म्हणाले की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी काही खेळाडू खूपच गंभीर झाले आहेत. पण खेळाडूंना त्यांच्या भावनांवर आळा घालायचा आहे. शनिवारी संघात मतभेद होते. त्यांनी सघ बैठकीत परिस्थितीवर चर्चा केली. आम्हाला लोकांच्या भावनांची जाणीव आहे. आम्ही हे सर्व बाजूला ठेवू आणि खेळाडूंना पु्न्हा एकदा देशासाठी खेळण्याची संधी मिळेल. परिस्थिती पाहता जितकं शक्य तितकं प्रोफेशनल आणि एकाग्र राहण्याचा प्रयत्न करू.
