कर्णधार होताच Shubman Gill चं पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक शतक, विराट कोहलीचा रेकॉर्ड ब्रेक
Shubman Gill Century IND vs ENG 1st Test : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून शुबमन गिल याने पदार्पणात शतक झळकावलं आहे. शुबमनने या खेळीसह विराट कोहली याला मागे टाकलं.

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शुबमन गिल याने कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात इंग्लंड विरुद्ध इतिहास घडवला आहे. शुबमनने हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात धमाकेदार शतक झळकावलं आहे. शुबमन या मालिकेत शतक करणारा यशस्वी जैस्वास याच्यानंतर टीम इंडियाचा आणि एकूण दुसरा फलंदाज ठरला. शुबमनने यासह विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे.
शुबमनने 75 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत शतक पूर्ण केलं. शुबमनने 57.75 च्या स्ट्राईक रेटने 156 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. शुबमनने या शतकी खेळीत 14 चौकार लगावले. शुबमनचं हे कसोटी कारकीर्दीतील सहावं तर सेना देशातील पहिलं शतक ठरलं. तसेच शुबमनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे 15 शतकं ठरलं आहे. शुबमनने कसोटी व्यतिरिक्त वनडेत 8 तर टी20i मध्ये 1 शतक केलं आहे.
विराट कोहलीचा रेकॉर्ड ब्रेक
शुबमनने सहाव्या कसोटी शतकासह टीम इंडिया माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. शुबमनने विराटचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील 5 शतकांचा विक्रम मोडीत काढला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात माजी फलंदाज रोहित शर्मा याने टीम इंडियासाठी सर्वाधिक 9 शतकं केली आहेत.
शुबमन याला 2021 पासून सेना देशात अर्धशतकही झळकावता आलं नाही. त्यात शुबमनला रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कर्णधारपद देण्यात आलं. त्यामुळे शुबमनसमोर इंग्लंड दौऱ्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्याचं आव्हान होतं. इंग्लंडने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर पहिल्या सत्राच्या शेवटी झटपट 2 विकेट्स गमावल्या. केएल राहुल आणि साई सुदर्शन आऊट झाले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात शुबमन गिल नाबाद परतलेल्या यशस्वी जैस्वालसह मैदानात आला. शुबमन आणि यशस्वी या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला आणि चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.
शुबमनचं कसोटीत शतकांचा ‘षटकार’
Leading from the front 💯📸
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/lwQQivYOzO
— BCCI (@BCCI) June 20, 2025
शुबमनने यशस्वीसह संधी मिळेल तशी फटकेबाजी केली आणि 2021 नंतर सेना देशातील पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं. शुबमनने 56 बॉलमध्ये 91.07 च्या स्ट्राईक रेटने 8 चौकारांसह हे अर्धशतक पूर्ण केलं. शुबमनने त्यानंतर पुढील 100 चेंडूत 50 धावा पूर्ण करत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 15 वं तर डब्ल्यूटीसी इतिहासातील सहावं शतक पूर्ण केलं.
