U19 WC 2026: उपांत्य फेरीसाठी तीन संघात चुरस, भारत पाकिस्तान सामना करो या मरोची लढाई
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने चुरस वाढली आहे. सुपर सिक्स फेरीच्या ग्रुप 1 मधून 4 संघ, तर ग्रुप 2 मधून 3 संघात चुरस निर्माण झाली आहे. ग्रुप 2 मधून उपांत्य फेरीसाठी भारत, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे.

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीची चुरस आणखी तीव्र झाली आहे. सुपर 6 सिक्स फेरीतील पहिल्या टप्प्याचे सामने पार पडले असून दुसऱ्या टप्प्यात उपांत्य फेरीचे चार संघ ठरणार आहेत. पण या चार संघांसाठी जोरदार चुरस आहे. गुण समान असले तरी नेट रनरेटच्या आधारावर एखाद्या संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. ग्रुप 1 मधून ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरस आहे. या गटातून दक्षिण अफ्रिका आणि आयर्लंड हे संघ बाद झाले आहेत. तर ग्रुप 2 मधीन भारत, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे. तर बांग्लादेश, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेचा संघ बाद झाला. खऱ्या अर्थाने चुरस आहे ती ग्रुप 2 मध्ये.. कारण या गटात भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात काहीही होऊ शकतं.
भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड या संघांनी सुपर सिक्समधील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे तिन्ही संघाच्या पारड्यात प्रत्येकी 2 गुण पडले आहेत. पण त्यामुळे पुढचा सामना तिन्ही संघासाठी महत्त्वाच असणार आहे. खासकरून भारत पाकिस्तान सामन्यावर नजर असणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट मिळणार आहे. भारतीय संघ दोन्ही सामने जिंकून सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करू शकतो. या सामन्यात भारताचा पराभव झाला तरी भारतीय संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळू शकतं. कारण भारताने झिम्बाब्वेला 204 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे 2 गुणांसह नेट रनरेटही चांगला आहे. पण पाकिस्तानचा नेट रनरेट कमी असला पाहिजे.
भारत अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अपराजित राहिला आहे. गट फेरीत अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे.पहिल्या सुपर सिक्स सामन्यात झिम्बाब्वेला हरवले आहे. भारत 6 गुणांसह या उपांत्य फेरीत स्थान जवळपास निश्चित झालं आहे. कारण नेट रन रेट +3.337 आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फक्त भारताला हरवून चालणार नाही. तर भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या नेट रन रेटचं गणित पाहून मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 1 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागून असणार आहे. एकतर पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. त्यात उपांत्य फेरीचं गणित या सामन्यावर अवलंबून असल्याने सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 16, तर पाकिस्तानने 11 वेळा विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
