U19 World Cup 2026: एकही सामना न जिंकता सुपर 6 मध्ये, टीमला लॉटरी, आता पाकिस्तान विरुद्ध लढत
ICC U19 World Cup 2026: आयसीसीच्या स्पर्धेत पुढील फेरीत पोहचण्यासाठी संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. मात्र एका संघाला साखळी फेरीत एकही सामना न जिंकता पुढील फेरीचं तिकीट मिळालं आहे.

भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 टीम वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारताने या स्पर्धेत आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने या विजयासह पुढील फेरीत धडक दिली आहे. या स्पर्धेत अनेक संघांनी कामगिरीच्या जोरावर सुपर 6 फेरीत धडक दिलीय. तर एका संघाला एकही सामना न जिंकता पुढील फेरीचं तिकीट मिळालंय. न्यूझीलंडला अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 6 फेरीचं तिकीट मिळालंय.
अंडर 19 न्यूझीलंड टीमने वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत 3 सामने खेळले. न्यूझीलंडला या 3 पैकी एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात करता आली नाही. मात्र त्यानंतरही न्यूझीलंडला पुढील फेरीचं तिकीट मिळालंय.
न्यूझीलंडची कामगिरी
न्यूझीलंडचा या मोहिमेतील पहिला सामना यूएसए विरुद्ध होता. मात्र 18 जानेवारीला झालेला हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यानंतर न्यूझीलंडचा स्पर्धेतील दुसरा सामनाही पावसामुळे वाया गेला. बांगलादेश-न्यूझीलंड सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. तर न्यूझीलंडला या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. मात्र साखळी फेरीतील 3 सामन्यांनंतर यूएसएच्या तुलनेत न्यूझीलंडच्या खात्यात 1 गूण जास्त होता. त्यामुळे न्यूझीलंडला सुपर 6 चं तिकीट मिळालं.
सुपर 6 चा मार्ग
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी 16 संघांची विभागणी 4-4 नुसार 4 गटात करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक गटातील अव्वल 3 संघ सुपर 6 साठी पात्र ठरणार आहेत. न्यूझीलंडला त्याचाच फायदा झाला. यूएसएच्या तुलनेत न्यूझीलंडकडे 1 गुण जास्त असल्याने त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. तसेच या ग्रुपमधून भारत आणि बांगलादेशनेही सुपर 6 मध्ये धडक दिलीय.
न्यूझीलंडसमोर पाकिस्तानचं आव्हान
दरम्यान न्यूझीलंडसमोर सुपर 6 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना हा 27 जानेवारीला होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 6 फेरीतील सामन्याचा थरार हा हरारे इथे रंगणार आहे.
