चॅम्पियन्स ट्रॉफीआधी वेस्ट इंडिजचा पाकिस्तानला दणका, कर्णधाराने असं फोडलं खापर
वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 120 धावांनी धुव्वा उडवला. खरं तर पहिल्या दिवशी वेस्ट उडालेली दाणादाण पाहता हा सामना पाकिस्तानच्या पारड्यात झुकलेला होता. पण त्यानंतर वेस्ट इंडिजने जबरदस्त कमबॅक केलं आणि पाकिस्तानला बरोबर कोंडीत पकडलं. यानंतर शान मसूदने पराभवाची कारणं सांगितली.

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. पाकिस्तानने पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचं पारडं जड दिसत होतं. कारण पहिल्या डावात वेस्ट इंडिजचे 8 खेळाडू 54 धावांवर बाद झाले होते. त्यामुळे हा सामना पाकिस्तानच्या पारड्यात झुकलेला दिसला. पण शेपटच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. नवव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी मोटी आणि रोच यांच्यात झाली. त्यानंतर शेवटच्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी मोटी आणि वारिकन यांच्यात झाली. त्यामुळे पाकिस्तानचं वेस्ट इंडिजला स्वस्तात गुंडाळण्याचं स्वप्न भंगलं. तसेच वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केलेल्या 163 धावांचं आव्हान गाठताना संपूर्ण संघ 154 धावांवरच गारद झाला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 9 धावांची आघाडी मिळाली होती. त्यात दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने 244 धावा केल्या आणि विजयासाठी 253 धावा दिल्या. पण हे आव्हान गाठताना पाकिस्तानची त्रेधातिरपिट उडाली आणि संपूर्ण संघ अवघ्या 133 धावांवर बाद झाला. हा सामना वेस्ट इंडिजने 120 धावांनी जिंकला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसून चांगलाच संतापलेला दिसला.
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद म्हणाला की, ‘त्यांनी चांगली फलंदाजी केली, याच गोष्टी आम्हाला शिकणं गरजेचं आहे. शेपटाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आम्ही संघर्ष केला.आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये चांगले केले, परंतु आम्ही दक्षिण आफ्रिकेत देखील संघर्ष केला. आत्ता ज्या गेममध्ये आम्ही हरलो. पहिल्या दिवशी आम्ही चांगल्या स्थितीत होतो. आमच्या लक्षात आले आहे की एका अतिरिक्त भागीदारीचा खेळांवर मोठा परिणाम होऊ शकतो. हेच आम्हाला शिकायचे आहे.अशा खेळपट्ट्यांवर आम्ही ४ पैकी ३ कसोटी जिंकल्या, पहिल्या सत्रातही आम्ही चांगली कामगिरी केली.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, अमीर जांगू, कावेम हॉज, अलिक अथानाझे, जस्टिन ग्रीव्हस, टेविन इम्लाच (विकेटकीपर), केविन सिंक्लेअर, गुडाकेश मोटी, केमार रोच, जोमेल वॉरिकन.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): शान मसूद (कर्णधार), मुहम्मद हुरैरा, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, साजिद खान, नोमान अली, काशिफ अली, अबरार अहमद.
