Womens World Cup: उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी भारतासह तीन संघ शर्यतीत, असं आहे समीकरण
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. तीन संघांनी उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. तर दोन संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. आता एका जागेसाठी तीन संघात चुरस आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 22 सामने पार पडले आहेत. 22वा सामना दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पार पडला. यानंतर गुणतालिकेतील चित्र बदललं आहे. या स्पर्धेतून दोन संघ बाद झाले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी आता तीन संघात चुरस असणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तान आणि बांग्लादेश हे संघ स्पर्धेतून आऊट झाले आहे. आता एका जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात चुरस असणार आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना करो या मरोची लढाई असणारा आहे. या सामन्यात विजयी संघाला उपांत्य फेरीच्या दृष्टीने बळ मिळणार आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तान हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. चला जाणून घेऊयात तिन्ही संघांचं समीकरण
भारतीय संघ उपांत्य फेरी कशी गाठणार?
भारताचे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन सामने शिल्लक आहे. दोन्ही सामने भारताला काहीही करून जिंकावे लागणार आहेत. भारताने दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीत जागा पक्की होणार आहे. भारताचे पुढचे दोन सामने न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत होणार आहे. 23 ऑक्टोबरला भारत न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला तर उपांत्य वाट बिकट होईल. भारताला शेवटच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करावं लागेल. इतकंच काय तर इंग्लंडने शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करणं भाग आहे.
न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी कशी गाठेल?
न्यूझीलंड संघालाही भारतासारखी उपांत्य फेरीची संधी आहे. पण भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं तर गणित बदलेल. न्यूझीलंडला शेवटच्या सामन्यात काहीही करून इंग्लंडला पराभूत करावं लागेल आणि भारत-बांग्लादेश सामन्याकडे लक्ष ठेवावं लागेल. या सामन्यात बांगलादेशने भारताला पराभूत केलं तर न्यूझीलंडला संधी मिळेल. पण यातही नेट रनरेटचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे.
श्रीलंकेला कशी मिळणार संधी?
महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेला काठावरची संधी आहे. यासाठी भारत न्यूझीलंडच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे. संपूर्ण गणित हे जर तर वर आहे. श्रीलंकेचा शेवटचा सामना शिल्लक असून पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच भारत न्यूझीलंड सामन्यात एक संघ तर विजयी होईल. त्या विजयी संघाचा शेवटचा सामन्यात पराभव व्हावा यासाठी प्रार्थना करावी लागेल. भारताला बांगलादेशने आणि न्यूझीलंडला इंग्लंडने पराभूत केलं पाहीजे. पण श्रीलंकेला त्यांच्यापेक्षा नेट रनरेट त्यांच्यापेक्षा चांगला ठेवावा लागेल.
