IND vs AUS: भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका जिंकली!

IND vs AUS: भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका जिंकली!

IND vs AUS  मेलबर्न:  टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीची डॅशिंग फलंदाजी आणि त्याला मिळालेल्या केदार जाधवच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर, भारताने ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचत, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला यजुवेंद्र चहलच्या फिरकीने 48.4 षटकात सर्वबाद 230 धावात रोखलं होतं. ऑस्ट्रेलियाचं 231 धावांचं आव्हान भारताने 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं. धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या, तर केदार जाधवने 57 चेंडूत नाबाद 61 धावा ठोकून धोनीला उत्तम साथ दिली. धोनी आणि केदार जाधवने चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. या सामन्यात 6 विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहलला सामनावीराचा तर या मालिकेत तीन अर्धशतकं झळकावणारा महेंद्रसिंह धोनी मालिकावीराचा मानकरी ठरला.

या विजयासह भारताने मालिकेचा शेवटही गोड केला. या मालिकेची सुरुवात तीन सामन्यांच्या टी ट्वेण्टी सामन्यांनी झाली होती. ही मालिका 1-1 अशी ड्रॉ झाली होती. त्यानंतर भारताने कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली होती, मग वन डे मालिकेतही भारताने पुनरावृत्ती करत 2-1 असा विजय मिळवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 9 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर शिखर धवनला स्टोईनिसने 23 धावांवर माघारी धाडत भारताची अवस्था 2 बाद 59 अशी केली. यानंतर विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीने भारताचा डाव सावरला. धोनी एका बाजूने अतिशय शांतपणे फलंदाजी करत होता, तर दुसरीकडे विराट कोहली धावफलक हलता राखण्याचा प्रयत्न करत होता. कोहली अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना, रिचर्डसनने त्याला बाद केलं. कोहलीने 62 चेंडूत 46 धावा ठोकल्या.

कोहली बाद झाल्यामुळे भारत काहीसा संकटात सापडला होता. भारताची धावगती कमी झाली होती, शिवाय खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत होती. फलंदाजांनी फटका मारला तरीही चौकार जात नव्हता. अशा परिस्थितीत धोनीने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली, त्याने या मालिकेत पहिल्यांदाज खेळत असलेल्या केदार जाधवला सेट होऊ दिलं. मग हळूहळू दोघांनी मैदानात पाय जमवला. आधी धोनीने आपलं अर्धशतक 74 चेंडूत पू्र्ण केलं. दुसऱ्या बाजूने हळूहळू केदार जाधवही अर्धशतकापर्यंत पोहोचला. अवघ्या 52 चेंडूत केदार जाधवने अर्धशतक झळकावून, विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल केली. अखेरच्या षटकात भारताला 1 धावेची गरज होती, त्यावेळी केदार जाधवने 1 चेंडू वाया जाऊ दिला. त्यानंतर केदार जाधवने चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी फिरकीपटू यजुवेंद चहलच्या भेदक 6 विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला230 धावांत गुंडाळलं. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका जिंकून इतिहास घडवण्यासाठी 50 षटकात 231 धावांची गरज होती. तिसऱ्या वन डे सामन्यात कुलदीप यादवच्या जागी स्थान मिळवलेल्या यजुवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्डस्कोम्ब, मार्कस स्टोइनिस, रिचर्डस्न आणि झाम्पा या सहा विकेट्स घेऊन कांगारुंची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाला 48.4 षटकात सर्वबाद 230 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हेण्डस्कोम्बच्या 58 धावा वगळता अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.

भारताकडून चहलने 6 तर भुवनेश्वर आणि शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताने आजच्या सामन्यासाठी तीन बदल केले. अंबाती रायुडू, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्याऐवजी केदार जाधव, युजवेंद्र चहल आणि विजय शंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. विजय शंकरचा हा पहिलाच वन डे सामना आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी चांगलंच जखडून ठेवलं. सलामीवीर कॅरीला भुवनेश्वरने 5 धावांवर माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर कर्णधार अरॉन फिंचलाही भुवनेश्वरने पायचित करुन ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. फिंचने 14 धावा केल्या. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी या सामन्यातही संयमी फलंदाजी केली. 2 बाद 27 वरुन त्यांनी तिसऱ्या विकेटसाठीचा किल्ला 100 धावांपर्यंत लढवला. मात्र यजुवेंद्र चहलच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच बॉलवर, धोनीने मार्शला स्टम्पिंग करत माघारी धाडलं. मार्शने 54 चेंडूत 39 धावा केल्या. मग त्याच ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर चहलने उस्मान ख्वाजाला 34 धावांवर बाद केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 101 अशी झाली.

यानंतर मार्कस स्टोइनिसलाही चहलने बाद करत कांगारुंचा निम्मा संघ 123 धावात माघारी धाडला. मॅक्सवेलने फटकेबाजी करत धावसंख्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र शमीच्या गोलंदाजीवर भुवनेश्वरने धावत येऊन उत्तम झेल टिपत त्याला तंबूत धाडलं.

एका बाजूने एक एक फलंदाज बाद होत असताना, पीटर हॅण्डस्कोम्बने मात्र टिच्चून फलंदाजी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने 38 षटकात 6 बाद 180 धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर चहलने कहर सुरुच ठेवला. चहलने रिचर्ड्सन, हॅण्डस्कोम्ब आणि अॅडम झाम्पाला तंबूत धाडलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 48.4 षटकात सर्वबाद 230 इतकीच मजल मारता आली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI