‘विनेश तू हरलेली नाहीस, आज ती प्रत्येक मुलगी…’ विनेशच्या निवृत्तीवर साक्षी मलिकचे जिव्हारी लागणारे शब्द
Vinesh Phogat Retires : विनेश फोगाटने आज सगळ्यांनाच धक्का दिला. काल जे घडलं, त्यानंतर तिने आज कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केलीय. तिचा हा निर्णय धक्कादायक आहे. विनेशने एक्सवर भावनिक पोस्ट करुन निवृत्ती जाहीर केलीय. तिच्या या निर्णयावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा म्हटलय. 50 किलो वजनी गटात खेळताना काल 100 ग्रॅम जास्त वजन भरल्याने विनेशला फायनलआधी अपात्र ठरवण्यात आलं. हा सगळ्या देशासाठी मोठा धक्का होता. कारण सुवर्ण किंवा रौप्य पदक निश्चित होतं. काल ज्या धक्कादायक घडामोडी घडल्या त्यानंतर आज विनेश फोगाटने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली. तिच्या या निवृत्तीवर ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली आहे. रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये साक्षीने भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. साक्षी या कठीण काळात भक्कमपणे विनेशच्या पाठिशी उभी राहिली आहे.
“विनेश तू हरलेली नाहीस. आज ती प्रत्येक मुलगी हरली आहे, जिच्यासाठी तू लढलीस आणि जिंकलीस. हा पूर्ण भारताचा पराभव आहे. सगळा देश तुझ्यासोबत आहे. खेळाडू म्हणून तुझ्या हिमतीला, संघर्षाला सलाम” असं साक्षीने तिच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. विनेश फोगाट कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात खेळत होती. मंगळवार-बुधवार असे दोन दिवस कुस्ती सामने होते. मंगळवारी सकाळी विनेश फोगाटच वजन 49.90 किलो होतं. जे 50 किलोच्या आत होतं. रिपोर्ट्सनुसार, सेमीफायनल मॅच झाल्यानंतर विनेशला एनर्जीसाठी जेवण देण्यात आलं. त्यामुळे तिचं वजन वाढून 52.700 किलोग्रॅम झालं.
विनेश तुम नहीं हारी हर वो बेटी हारी है जिनके लिए तुम लड़ी और जीती। ये पूरे भारत देश की हार है 😭 देश तुम्हारे साथ है। खिलाड़ी के तौर पे उनके संघर्ष और जज्बे को सलाम 🙏🫡@Phogat_Vinesh https://t.co/8W5MpdYUvD
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) August 8, 2024
जे शक्य होतं, ते सर्व केलं
त्यानंतर रात्रभर मेडीकल टीमने तिचं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर तिला व्यायाम करायला लावला. स्किपिंग आणि सायकलिंग वजन कमी करण्यासाठी जे-जे आवश्यक आहे, ते सर्व केलं. सॉना बाथ सुद्धा घेतला. नखं कापली. या सगळ्या प्रयत्नानंतर विनेशच वजन कमी झालं. पण अखेरीस 50.100 किलो वजन काट्यावर दिसलं. त्या 100 ग्रॅममुळे तिची फायनलची संधी हुकली.
