virat kohli : बारावीनंतर विराट कोहलीने शिक्षण का सोडले?
अनेक अडचणींवर मात करून विराट कोहली आज जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक झाला आहे हे आपल्याला माहिती आहेच, पण बारावीनंतर त्याने शिक्षण का सोडले, ही खरी कहाणी कदाचित अनेक चाहत्यांना माहीत नसेल…

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत 123 कसोटी सामने खेळले आणि 210 डावांत 9230 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याचा सर्वोच्च स्कोअर 254 धावा नाबाद आहे. याशिवाय, त्याने 30 शतके आणि 31 अर्धशतके ठोकली. बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या किंवा बारावी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी विराट प्रेरणा आहे. त्याने बारावीनंतर शिक्षण सोडून क्रिकेटचा मार्ग निवडला आणि आज तो जगातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. विराटने आपल्या बॅटने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आणि भारतीय संघाला यशोशिखरावर नेले. चला, जाणून घेऊया विराटच्या शिक्षणाची कहाणी.
विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीतील उत्तम नगर येथे पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली वकील होते, तर आई सरोज कोहली गृहिणी होत्या. विराटच्या कुटुंबात मोठा भाऊ विकास कोहली आणि बहीण भावना कोहली आहे. विराटचे शिक्षण दिल्लीतच झाले. त्याने पश्चिम विहार येथील विशाल भारती पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात तो ठीकठाक होता, पण त्याचा खरा ओढा क्रिकेटकडे होता. लहानपणापासून तो गल्ली क्रिकेट खेळायचा. त्याच्या या आवडीला पाहून त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
विराट कोहली वयाच्या तीन वर्षांपासून प्लास्टिकच्या बॅटने खेळायचा. त्याचे वडील त्याचे पहिले प्रशिक्षक होते. क्रिकेटबद्दलची त्याची आवड पाहून वडिलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्याला वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमीत दाखल केले. तिथे तो पहाटे लवकर उठून प्रशिक्षण घ्यायचा आणि रात्री उशिरापर्यंत सराव करायचा. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्याला क्रिकेटच्या बारकाव्या शिकवल्या. विराट क्रिकेटमध्ये इतका गुंतला की, त्याने फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने क्रिकेटसाठी शिक्षण सोडले. हा निर्णय त्याच्यासाठी सोपा नव्हता, कारण त्याच्या कुटुंबात शिक्षणाला खूप महत्त्व होते. पण, वडिलांनी त्याला साथ दिली आणि विराट पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू लागला.
एक प्रसारमाध्यम अहवालानुसार, विराटने शिक्षण सोडण्याचा निर्णय तेव्हा घेतला, जेव्हा तो दिल्लीच्या ज्युनियर संघात स्थान मिळवून स्थिरावला होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने बारावीपर्यंत शिक्षण चालू ठेवले, पण क्रिकेटचा सराव आणि स्पर्धांमुळे त्याला शाळेत वेळ देता येत नव्हता. एका मुलाखतीत विराटने सांगितले होते की, त्याचे वडील त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला सांगायचे, कारण त्यांना त्याच्या प्रतिभेवर विश्वास होता.
विराटने मागे वळून पाहिले नाही
विराटच्या नशिबाने 2002 मध्ये वळण घेतले, जेव्हा वयाच्या 14व्या वर्षी त्याची दिल्लीच्या अंडर-14 संघात निवड झाली. त्याच्या फलंदाजीने त्याला लवकरच अंडर-16 आणि अंडर-19 संघात स्थान मिळवून दिले. 2008 मध्ये मलेशियात झालेल्या अंडर-19 विश्वचषकात त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने विजय मिळवला. यानंतर बीसीसीआयने त्याला सीनियर संघात संधी दिली. ऑगस्ट 2008 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले. सुरुवातीला तो राखीव फलंदाज होता, पण लवकरच त्याने मधल्या फळीत आपले स्थान पक्के केले. 2011 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये विक्रमांची मालिका रचली.
आयुष्यात अनेक चढ-उतार
विराटच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. डिसेंबर 2006 मध्ये वयाच्या 54व्या वर्षी त्याच्या वडिलांचा मेंदूच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा विराट फक्त 18 वर्षांचा होता आणि तो दिल्लीसाठी रणजी करंडकात कर्नाटकविरुद्ध खेळत होता. वडिलांच्या निधनानंतरही त्याने त्या सामन्यात 90 धावा करून संघाला संकटातून बाहेर काढले. विराटने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिका आणि 2024 मध्ये मुलगा अकाय यांचा जन्म झाला. कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर विराट पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याची कहाणी त्या सर्व तरुणांसाठी प्रेरणा आहे, जे क्रिकेटच्या विश्वात आपले नाव कमवू इच्छितात
