रोज कार्यालयात या, आठवड्यात 60 तास काम करा…जगातील सर्वात मोठ्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सूचना
Google AI: कंपनीचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 60 तास काम करण्याचा आणि दररोज कार्यालयात येण्याचा सल्ला दिला आहे.

Google AI: विविध कंपनी आणि कंपनीच्या संस्थांपकांकडून कर्मचाऱ्यांना जास्त काम करण्याचा सल्ला दिला जात आहे. भारतात त्याची सुरुवात इन्फोसिसचे को फाउंडर नारायण मूर्ती यांनी केली होती. त्यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. 40 वर्ष मी 70 तासापेक्षा जास्त काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर एल एँड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यन यांनी 90 तास काम करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. आता गूगलने आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.
कमी काम करणाऱ्यांना इशारा
आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या (एजीआय) स्पर्धेत गुगल मागे राहू इच्छित नाही. यामुळे कंपनीचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 60 तास काम करण्याचा आणि दररोज कार्यालयात येण्याचा सल्ला दिला आहे. ब्रिनने एका अंतर्गत मेमोमध्ये सांगितले की, Google एआयचा स्पर्धेत जिंकू शकतो. परंतु त्यासाठी कर्मचाऱ्यांनी कठोर मेहनत करायला हवी. जास्त वेळ काम करायला हवे. प्रत्येक दिवशी कार्यालयात यावे. आपले प्रॉडक्शन वाढवावे. तुम्ही सर्वांनी 60 तास काम करणे चांगले असणार आहे. परंतु त्यापेक्षा जास्त काम केले तर बर्नआउट होऊ शकतो. बर्नआउट हे एक सिंड्रोम आहे. त्याला कार्यालयातील तणाव म्हटला जातो. काही कर्मचारी कमी काम करत आहे. त्यामुळे टीमच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम होत आहे.
गुगलने का घेतला निर्णय?
गुगलने एवढा मोठा निर्णय घेतला आहे, कारण गुगलची एजीआय डेव्हलपमेंट टीम जेमिनी एआयवर काम करत आहे. ब्रिनच्या मते, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बाजूने अधिक प्रयत्न केले तर Google एआयच्या जगात आघाडीवर राहू शकते. एजीआयची अंतिम शर्यत सुरू झाली आहे. जे जिंकण्यासाठी Google सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
ब्रिनच्या निर्णयावरून एक गोष्ट स्पष्ट होते की टेक कंपन्या हायब्रीड वर्क पॉलिसीपासून बंद करत आहेत. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यालयात आणण्यावर भर देत आहेत. याआधी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
