Airtel पासून ते BSNL पर्यंत eSIM कसे सक्रीय करायचे? फायदा काय होणार? वाचा A टू Z प्रोसेस!
बीएसएनएलने अलीकडेच आपल्या काही टेलिकॉम सर्कलमध्ये ईसिम सेवा सुरू केली आहे. एअरटेल, जिओ आणि व्हीआय (व्होडाफोन आयडिया) या कंपन्या आधीपासूनच ही सेवा देत आहेत. ही सेवा कशी सक्रीय करायची ते जाणून घेऊयात.

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएलने अलीकडेच आपल्या काही टेलिकॉम सर्कलमध्ये ईसिम सेवा सुरू केली आहे. एअरटेल, जिओ आणि व्हीआय (व्होडाफोन आयडिया) या कंपन्या आधीपासूनच ही सेवा देत आहेत. ईसिम हे फिजिकल सिम कार्डसारखेच काम करते, मात्र हे सिम वापरण्यासाठी तुमच्याकडे ईसिमला सपोर्ट करणारा स्मार्टफोन असायला हवा. तुम्ही अॅपल आयफोन, गुगल पिक्सेल आणि सॅमसंग गॅलेक्सी एस सिरीजमधील फोनमध्ये ईसिम सेवा वापरू शकता. ईसिम कसे सकीरिय करायचे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ईसिम वापरण्याचे फायदे
तुम्ही वापरत असलेले फिजिकल सिम कार्ड खराब होऊ शकते, मात्र ईसिम खराब होत नाही. मात्र ईसिम वापरताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण फोनवरून चुकून ते डिलीट झाल्यास तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ईसिम वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.
ईसिम कसे सक्रीय करायचे?
Jio कंपनीचे यूजर्स मायजिओ अॅपद्वारे ईसिमसाठी विनंती करू शकतात किंवा जवळच्या जिओ स्टोअरला भेट देऊन ईसिम सक्रीय करुन घेऊ शकतात.
एअरटेल आणि व्हीआयचे यूजर्स कंपनीच्या अॅपद्वारे ईसिमसाठी अर्ज करू शकतात. तसेच 121 वर कॉल करून किंवा एसएमएस पाठवून ईसिमसाठी अर्ज करू शकतात.
BSNL चे सिमकार्ड वापरणाऱ्यांना eSIM सक्रीय करण्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. eSIM साठी अर्ज करण्यासाठी तुमची KYC पूर्ण करणे गरजेचे असेल. यासाठी आधार कार्ड सोबत न्यावे लागेल.
ईमेलमध्ये eSIM साठी QR कोड मिळेल
तुमचा ईसिमसाठीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि “मोबाइल नेटवर्क” किंवा “सेवा” वर क्लिक करा आणि “eSIM जोडा” किंवा “eSIM डाउनलोड करा” वर क्लिक करा. यानंतर “USE QR Code” निवडा आणि ईमेलवर मिळालेला QR कोड स्कॅन करा. त्यानंतर तुम्हाला एक IVR कॉल येईल आणि त्यानंतर eSIM साठी प्रक्रिया केली जाईल. यासाठी 4 तासांचा कालावधी लागू शकतो.
eSIM सक्रीय झाल्यानंतर फिजिकल सिममध्ये नेटवर्क कनेक्शन दिसणार नाही. ईसिमद्वारे तुम्ही फिजिकल सिममध्ये मिळणारे सर्व फीचर मिळतील. मात्र ट्रायच्या नियमांनुसार पहिल्या 24 तासांत तुम्हाला कोणताही SMS मिळणार नाही किंवा तुम्ही कोणताही SMS पाठवू शकणार नाहीत.
