उन्हाळ्यातही फोनची बॅटरी तासन् तास टिकवायचीये? हे सोपे उपाय आजच करा
स्मार्टफोनची बॅटरी वारंवार खराब होतेय? या छोट्या पण प्रभावी टिप्स अमलात आणल्या नाहीत तर फोनचं आयुष्य धोक्यात येईल. त्यामुळे आजच या सवयींची सवय लावा आणि तुमचा फोन वर्षानुवर्षं टिकवा!

आजकाल स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, अनेकदा आपण अनुभवतो की रात्री पूर्ण चार्ज केल्यानंतरही सकाळी उठल्यावर फोनची बॅटरी कमी झालेली असते. हा त्रास वारंवार होतो का? मग काळजी करू नका! काही सोप्या आणि प्रभावी टिप्स फॉलो केल्यास तुमचा फोन तासन् तास चालू राहील आणि बॅटरीचं आयुष्यही वाढेल.
सर्वात पहिले लक्षात ठेवायचं म्हणजे रीसेंट अॅप्स बंद करू नका. अनेकांना वाटतं की अॅप्स बंद केल्याने बॅटरी वाचते, पण खरं तर यामुळे उलट फोनवर जास्त ताण येतो. आधुनिक अँड्रॉइड आणि आयओएस सिस्टम अॅप्सना योग्यरित्या व्यवस्थापित करतात. त्यामुळे अॅप्स उघडल्यावर त्यांना पुन्हा लोड होण्यापेक्षा सुरूच ठेवणं बॅटरीसाठी जास्त फायदेशीर ठरतं.
तसेच, गेम खेळताना किंवा जड अॅप्स वापरताना फोन चार्जिंग करू नये. चार्जिंगमुळे आधीच फोन गरम होतो आणि त्यावर जड अॅप्स वापरल्याने उष्णता वाढते. यामुळे बॅटरी लवकर खराब होते. त्यामुळे गेमिंग करताना किंवा जड काम करताना फोन चार्जिंगपासून दूर ठेवा.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्सवर नियंत्रण ठेवा. काही अॅप्स सतत बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि बॅटरी झपाट्याने संपवतात. अँड्रॉइड फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘अॅक्टिव्ह अॅप्स’ पाहा आणि गरज नसलेली अॅप्स बंद करा. यामुळे बॅटरी वाचते आणि फोन अधिक काळ टिकतो.
उन्हात फोनचा वापर कमी करावा. खूप गरम ठिकाणी फोन वापरल्यास बॅटरीचा दर्जा घसरतो. गरम वातावरणात फोन जास्त गरम झाल्यास बॅटरीचे नुकसान होते. शक्य असेल तेव्हा फोन थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा.
फोनची बॅटरी नेहमी ८० टक्क्यांपर्यंतच चार्ज करा. पूर्ण १०० टक्के चार्जिंग टाळल्यास बॅटरीवर कमी ताण येतो आणि तिचं आयुष्य वाढतं. बरेच स्मार्टफोन ब्रँड्स सुद्धा हेच सुचवतात. दररोजच्या वापरासाठी ८० टक्क्यांवर चार्जिंग थांबवा आणि फक्त गरजेच्या वेळीच फुल चार्ज करा.
