भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वेबसाइट्स कोणत्या? पहा यादी
आजच्या डिजिटल युगात भारतात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढतो आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी लोक वेगवेगळ्या वेबसाइट्सना भेट देतात. पण खरंच, भारतीय सर्वाधिक कोणत्या साइट्स बघतात? कोण आहे नंबर 1 वर? चला पाहूया...

आजच्या काळात इंटरनेट हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेकदा आपला मोबाईल हातात घेतला जातो कधी गुगलवर काही सर्च करायला, तर कधी सोशल मीडियावर अपडेट चेक करायला. इंटरनेटशिवाय एक दिवसही सुसह्य वाटत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की भारतात लोक कोणत्या वेबसाइट्स सर्वाधिक पाहतात? कुठे सगळ्यांत जास्त वेळ घालवला जातो? याचं उत्तर काहीसं आश्चर्यजनक आहे.
आज भारतात सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट म्हणजे Google. दररोज कोट्यवधी लोक वेगवेगळ्या माहितीच्या शोधासाठी गुगलचा वापर करतात मग ती एखाद्या पदार्थाची रेसिपी असो, सरकारी योजना, वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा अगदी UPSC च्या अभ्यासासाठी हवी असलेली माहिती. ‘गुगल करा’ हे आता एक वाक्य न राहता सवय झाली आहे. त्यामुळे गुगलचं टॉप वर असणं स्वाभाविक आहे.
YouTube
गुगलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे YouTube. एकेकाळी केवळ व्हिडिओ बघण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ आता भारतातील सर्व वयोगटातील लोकांसाठी मनोरंजन, शिक्षण, माहिती आणि व्यवसाय यांचं प्रमुख साधन बनलं आहे. म्युझिक, कॉमेडी, न्यूज, गेमिंग, एज्युकेशन अशा सगळ्या क्षेत्रात यूट्यूबचा वापर वाढला आहे. लाखोंच्या संख्येने भारतीय रोज यावर काही ना काही बघत असतात.
Instagram आणि Facebook
फेसबुकची लोकप्रियता तर काहीशी कमी झाली असली, तरीही भारतात अजूनही कोट्यवधी लोक रोज फेसबुक वापरतात. जुने मित्र शोधणे, फोटो शेअर करणे, आणि ग्रुपमध्ये चर्चा करणे यासाठी आजही ही साइट लोकांच्या आवडती आहे.
दुसरीकडे, इंस्टाग्राम हे आता केवळ फोटो शेअर करण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आज रील्स, स्टोरीज आणि लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तरुणाई यावर खूप वेळ घालवत आहे. विशेषतः लहान शहरांमध्ये रील्स बनवणं हे ट्रेंडमध्ये आहे.
WhatsApp Web
मोबाईलवर WhatsApp वापरणं सगळ्यांनाच माहिती आहे, पण सध्या Work from Home आणि हायब्रिड वर्कच्या काळात WhatsApp Webचा वापर प्रचंड वाढला आहे. ऑफिसमधील कम्युनिकेशन, फाइल शेअरिंग, टीम मीटिंग्ससाठी व्हॉट्सअॅप वेब अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
Amazon आणि Flipkart
ऑनलाइन शॉपिंग ही आता भारतीयांची नवी सवय झाली आहे. Amazon आणि Flipkart या दोन्ही साइट्स रोज लाखो वेळा ओपन केल्या जातात. विशेषतः सेल सीझनमध्ये तर इतका ट्रॅफिक वाढतो की काही वेळा वेबसाइट स्लो किंवा क्रॅश होण्याची वेळ येते.
Wikipedia
शाळेतील प्रोजेक्ट असो वा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास Wikipediaचा वापर माहिती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. हिंदी, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेली ही साईट अभ्यास करणाऱ्यांसाठी एक अमूल्य साधन बनली आहे.
