लग्न करा, मुलं जन्माला घाला नाहीतर नोकरीवरून काढून टाकू … कंपनीचा विचित्र निर्णय
एका कंपनीचे अजब फर्मान सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. लग्न करा नाहीतर नोकरी गमवा असा इशारा या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला आहे. जन्मदर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही गोष्टी पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यावर लग्नापासून दूर राहायला सुरुवात केली आहे. जर चीनबद्दल बोलायचं झालं तर तिथे असे बरेच तरुण आहेत जे आजकाल लग्न पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र याच कारणामुळे तेथील सरकार आणि कंपन्या बॅचलर्सना लवकरात लवकर लग्न करून स्थायिक होण्यासाठी आणि मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. या संदर्भात एका चिनी कंपनीची एक जबबातमी समोर आली आहे. मात्र ती ऐकून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे.
कोणत्याही व्यक्तीने लग्न करणे किंवा न करणे हा त्याचा स्वतःचा निर्णय असतो, परंतु जर कंपनी अविवाहित लोकांना लग्न करण्यास भाग पाडत असेल तर काय होईल? हे ऐकायला जरी विचित्र वाटत असंल तरी हेच खरं आहे.खरंतर चीनमध्ये एका कंपनीने त्यांच्या अविवाहीत कर्मचाऱ्यांना लग्न न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे. सप्टेंबर महिन्यापूर्वी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी लग्न करावं असा कंपनीचा हेतू असल्याचं समजतं.
लग्नं करा नाहीतर नोकरी गमवा
पूर्व चीनच्या शानडोंग प्रांतातील शुंटियान केमिकल ग्रुपने गेल्या जानेवारीत एक घोषणा केली. कंपनीचा विवाह दर वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे असे त्यात नमूद करण्यात आलं. ज्याअंतर्गत कंपनीत काम करणाऱ्या 28-58 वर्षांच्या अविवाहित किंवा घटस्फोटित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लग्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जून अखेरपर्यंत लग्न न केल्यास त्यांचे मूल्यमापन केले जाईल आणि सप्टेंबरपर्यंत अविवाहित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल, असे कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी सांगितले.
चीन सरकारला देशातील लग्नाचे प्रमाण वाढवायचे असल्याने कंपनीने हा विचित्र निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला आणि अखेर 13 फेब्रुवारी रोजी हा नियम मागे घेण्यात आला. हे चीनच्या कामगार कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले. ही बातमी सोशल मीडियावर येताच ती वणव्यासारखी पसरली आणि लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. चीनमध्ये काहीही घडू शकतं असं म्हमतं नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स केल्या.
