मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दादर येथे लावण्यात आलेले 'सटोगे तो बचोगे, बटोगे तो पिटोगे' असे पोस्टर सध्या चर्चेत आले आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी हे पोस्टर्स लावले आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेचा महापौर मराठी होणार असा दावा मनसे आणि उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र आता उत्तर भारतीय विकास सेनेने दादरच्या शिवाजीपार्क येथे पोस्टर प्रसिद्ध करीत ‘सटोगे तो बचोगे, बटोगे तो पिटोगे‘असा नारा दिला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे घटनेनुसार कोणताही नागरिक येऊ शकतो आणि राहू शकतो. येथील भूमिपूत्रच महापौर होईल आणि तो उत्तर भारतीय असेल असेही शुक्ला यांनी म्हटले आहे. शिवसेना असो की भाजपा दोघांनाही महापालिकेची तिजोरी लुटायची आहे. आता मनसेलाही तिजोरी लुटायची आहे म्हणून ते एकत्र आले आहेत असाही दावा सुनील शुक्ला यांनी केला आहे. उत्तर भारतीय विकास सेना मुंबईत १०० तिकीटे मराठी माणसांना देणार असल्याचेही सुनील शुक्ला यांनी म्हटले आहे.
